चांदिवली येथे खानावळ चालवणाऱ्या २३ वर्षीय मालकाला उधारीवर भोजन देण्यास नकार दिल्याने दोन जणांनी मिळून त्याचा खून केल्याचा प्रकार रविवारी घडला. साकीविहार रोडवरील नित्यानंद गॅरेजजवळ ही घटना घडली. पवई पोलिसांनी दोन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदिवली येथील रहिवासी आसिफ आणि आरिफ अन्सारी हे चांदिवली येथे खानावळ चालवतात. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी आरिफ हे खानावळीच्या ठिकाणी असताना रात्री आठच्या सुमारास विपुल सोलंकी (वय २२) नामक एक तरुण तेथे आला. “त्याने आरिफकडे जेवणाची मागणी केली. परंतु, आरिफने त्याला त्याचे एक महिन्याचे प्रलंबित बिल भरण्यास सांगितले. त्यावरून विपुल याने चिडून त्याचा मोठा भाऊ प्रकाश सोलंकी (वय २५) याला बोलावले,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
“दोघांनी आरिफला रेस्टॉरंटमधून बाहेर बोलावून नित्यानंद गॅरेजजवळ त्याच्याशी वाद घालत, त्याच्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी करून दोघेही घटनास्थळावरून फरार झाले,” असे याबाबत बोलताना पवई पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दळवी यांनी सांगितले.
आरिफला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी भारतीय दंड संहिताच्या कलम ३०२ (खून) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
“फरार दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांचा मुंबई आणि आसपासच्या सर्व मित्र आणि नातेवाईकांकडे शोध सुरु आहे,” असेही याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
No comments yet.