सराईत मोटारसायकल चोराला अटक, ४ एक्टिवा हस्तगत

पवई पोलिसांनी हस्तगत केलेल्या एक्टिवा मोटारसायकल

पवई परिसरातून फक्त एक्टिवा मोटारसायकली चोरी करणाऱ्या सराईत मोटारसायकल चोराला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पवई पोलिसांनी ४ एक्टिवा मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. नसीर सद्दान खान (५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वीही २०१५ साली त्याला पवई पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ३२ एक्टिवा आणि ४ कार हस्तगत करत मुंबईतील सर्वांत मोठ्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली होती.

पवई परिसरातून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये पाठीमागील काही दिवसात वाढ दिसू लागली होती. विशेष म्हणजे चोरीला जाणाऱ्या गाड्यांमध्ये एक्टिवा गाड्यांचे प्रमाण हे सर्वाधिक होते. त्यामुळे या विशेष चोराला पकडणे पोलिसांसाठी आवश्यक झाले होते.

आरोपी नसीर सद्दान खान

“चोरटा परिसरात कामासाठी येणाऱ्या मुंबईकरांच्या आणि पार्क करून ठेवलेल्या गाड्यांवर नजर ठेवून असे. संधी मिळताच काही सेकंदात गाडी चालू करून पसार होत असे.” असे पोलिसांनी सांगितले.

पवईतील सुप्रीम बिसनेस पार्क येथून एक्टिवा चोरीला गेल्याची घटना गेल्या आठवड्यात घडल्यानंतर याची तक्रार पवई पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. “आम्ही सीसीटीव्हीची पाहणी केल्यावर लेक केसल इमारतीच्या फुटेजमध्ये एक व्यक्ती ब्राऊन कलरच्या एक्टिवावरून सुप्रीम बिसनेसपार्ककडे जाताना आढळून आला होता. मात्र, परत जाताना तो दुसरीच एक्टिवा मोटारसायकल घेवून जाताना दिसला.” असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यश पालवे यांनी सांगितले.

संशयिताचे फोटो पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डमध्ये तपासून पाहिले असता सदर वर्णनाच्या एका व्यक्तीला आधीही अटक करण्यात आल्याचे समोर आले होते. “माहितीच्या आधारावर पाळत ठेवून आम्ही नसीर याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या ४ एक्टिवा आम्ही हस्तगत केल्या आहेत.’ असेही पालवे यांनी सांगितले.

“अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मुंबई आणि नवीमुंबईतील विविध पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असून, अटक सुद्धा करण्यात आली होती, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दळवी यांनी सांगितले.

आरोपी एक्टिवा मोटारसायकल चोरी करण्यात सराईत आहे. काही क्षणातच तो मोटारसायकलच्या समोरील भागात असणाऱ्या प्लगच्या वायर तोडून त्यात दुसऱ्या वायरने कनेक्शन बनवून मोटारसायकल बिनाचावी चालू करून चोरी करतो, असेही पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले.

https://www.facebook.com/alinasalonpowaii

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: