पवईतील फिल्टरपाडा, नीटी भागात दहशत पसरवून लोकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या आणि खंडणी देण्यास नकार देणाऱ्या लोकांचे अपहरण करून जबरदस्ती खंडणी वसूल करणाऱ्या गुन्हेगारी टोळीला पवई पोलिसांनी बेड्या ठोकून मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई केली आहे. पवई पोलीस ठाणे हद्दीत मोक्का अंतर्गत केली जाणारी ही पहिलीच कारवाई आहे.
मुख्य आरोपी अमीन मोमीन खान, सोयब अमीन खान, मुबारक मोमीन खान, जाफर अमीन खान अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमीन आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून परिसरात खंडणी वसूल करणे, धमकावणे आणि अपहरण सारखे गुन्हे करत होता. कोठडीत शिक्षा भोगणारा अमीन पे-रोलवर बाहेर आला की आपल्या साथीदारांसोबत अशाप्रकारचे गुन्हे करत असतो. वर्षाच्या सुरुवातीला असाच पे-रोलवर बाहेर असताना एका व्यावसायिकाला त्यांनी खंडणीसाठी धमकावले होते. व्यावसायिकाने खंडणी देण्यास नकार देताच त्याचे अपहरण करून त्याच्याकडून जबरदस्ती खंडणी वसूल करण्यात आली होती. ज्यानंतर मिळालेल्या तक्रारीवरून अमीनसह त्याच्या साथीदाराला पवई पोलिसांनी अटक केली.
पूर्व इतिहास
छोट्या-मोठ्या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या अमीनचे पहिल्यांदा गंभीर गुन्ह्यात नाव आले ते २० मार्च २००४ साली नवीन दुबे आणि हौशीला उपाध्याय यांच्या खुनाच्या गुन्ह्यात. अमिनचा लहान भावू अमरोज सोबत त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.
‘गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतर २०१४ मध्ये अमीनला पे-रोलवर बाहेर सोडण्यात आले होते. परिसरात परतताच त्याने खंडणीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. या प्रकारातच २०१४ साली त्याने अजून एक खून केल्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.
२०१८ साली तो पुन्हा पे-रोलवर बाहेर आला आणि त्याने परिसरात दहशत पसरवत खंडणीसाठी अपहरण करण्यास सुरुवात केली या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने या आणि यापूर्वीचे गुन्हे स्पष्ट होताच त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी पवई पोलिसांनी केली होती.
अमीनसह त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून कारवाई केली असल्याचे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी शिक्कामोर्तब केले.
साकीनाका विभागाचे पोलीस सहाय्यक आयुक्त मिलिंद खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनी अनिल पोफळे, पोलीस निरीक्षक दिलीप धामुनसे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड आणि पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण यादव यांनी ही कारवाई केली.
‘अमीन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी परिसरात मोठी दहशत पसरवली होती. एथिक स्थानिक व्यावसयिक त्यांच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीला घाबरून त्यांना खंडणी देत असत. त्यांची परिसरात एवढी दहशत होती की त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास येण्यास ही स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक घाबरत आहेत.’ असेही याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पवई पोलिसांनी ऐन निवडणुकीच्या पूर्वी मोक्का अंतर्गत केलेल्या या कारवाईमुळे कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत तर होणारच आहे सोबतच परिसरात चालणाऱ्या संघटीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे कंबरडे मोडले गेले असल्याचे मत पवईकरांकडून व्यक्त केले जात आहे.
मोक्का कायदा कसा/ कधी अवलंबला जातो
भारतीय दंड विधान संहितेच्या कलमाखाली गुन्हेगार, टोळ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण असल्याचे संबंधित तपास अधिकाऱ्याला वाटल्याने गुन्हेगारांच्या शेवटच्या गुन्ह्य़ाचा दाखला देऊन हा अधिकारी ‘मोक्का’नुसार कारवाईची मागणी नोंदवतो. त्यासाठी तो तपास अधिकारी त्या टोळीबद्दल एक अहवाल तयार करून मोक्कांर्तगत कारवाई करण्यासाठी मोक्का कायदा कलम २३ (१) अनुसार पोलीस उपमहासंचालक यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज करतो. त्या अर्जासोबत आरोपीच्या किंवा टोळीच्या पाठीमागील दहा वर्षांच्या गुन्ह्य़ांचा अहवाल पाठविला जातो. त्या अहवालाचा अभ्यास करून मोक्का लावण्यास पोलीस उपमहासंचालकांकडून मंजुरी येते. मोक्कांर्तगत कारवाई केलेल्या टोळीचा तपास करण्यासाठी शहरामध्ये सहायक पोलीस आयुक्त व ग्रामीण भागात पोलीस उपअधीक्षक यांची नेमणूक केली जाते. हा तपास पूर्ण करून पुन्हा तो अहवाल राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवून आरोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी मागितली जाते. त्यास मंजुरी दिल्यानंतर मोक्कांर्तगत टोळीवर किंवा त्या आरोपीवर आरोपपत्र दाखल केले जाते. त्यानंतर विशेष न्यायालयात खटला चालविला जातो.
No comments yet.