आपल्या कुटुंबासह लोणावळ्याला सुट्टीवर जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडोला ६१ हजार रुपये ऑनलाइन फसवणुकीत गमवावे लागले आहेत. मूळचे उत्तर प्रदेशातील अलिगढचे असणारे सिंग पवई जवळील एनएसजी क्वार्टरमध्ये राहतात.
त्यांनी पवई पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, काही दिवसांपूर्वी त्यांचे कुटुंब मुंबईत आले आहे. त्यामुळे कुटुंबासोबत मुंबई जवळील लोणावळा हिल स्टेशनला सुट्टी घालवण्याचा त्यांचा बेत होता. सिंग यांनी ऑनलाईन हॉटेल बुक केले होते. हिल स्टेशनला जाण्यासाठी त्यांना कॅबची गरज असल्याने १७ सप्टेंबर रोजी इंटरनेटवरून प्राप्त झालेल्या एका ट्रॅव्हल एजन्सीला त्यांनी फोन केला होता.
“फोन उचलणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख योगेश शर्मा अशी करून देत बुकिंगसाठी १०० रुपये भरण्यास सांगत तक्रारदार यांना व्हॉट्सअॅपवर एका वेबसाइटची लिंक पाठवली,” असे पवई पोलीस म्हणाले.
सिंग यांनी त्या वेबसाईटवर त्यांच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला. त्यानंतर शर्माने त्यांना व्हॉट्सअॅपवर अजून एक लिंक पाठवून ते डाउनलोड करण्यास सांगितले. मी लिंक डाऊनलोड केल्यानंतर, मला माझ्या बँकेकडून एक संदेश आला की माझ्या क्रेडिट कार्ड खात्यातून ६१,००० रुपये डेबिट झाले आहेत असे सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
यासंदर्भात सिग यांनी बँकेशी संपर्क साधला असता त्यांची फसवणूक झाली असल्याचे समोर येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात यासंदर्भात फसवणुकीची तक्रार दाखल केली.
“तक्रारदार यांनी तक्रारीत दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही तपास सुरु केला असून, सदर नंबर हा कोणाच्या नावे घेण्यात आला आहे यासोबतच इतर बाबींचा शोध सुरु आहे,” पोलीस म्हणाले.
No comments yet.