पवईतील निटी भागात प्रार्थनेसाठी आलेल्या एका वृद्ध दाम्पत्यास पुढे खून झाल्याची बतावणी करून दोन ठगांनी तीन तोळे सोने लुटल्याची घटना समोर आली आहे. पवई पोलिसांनी याबाबत फसवणुकीचा गुन्हा नोंद करून, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे.
याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीमुंबई येथे राहणारे बलराज नाडर (७१) तसेच त्यांच्या पत्नी व्हिक्टोरिया (६४) सोबत आपल्या पवई येथील मित्राच्या घरी रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान प्रार्थनेसाठी आले होते. साकीविहार रोडवरील आंबेडकर उद्यान येथील बस थांब्यावर ते उतरून आपल्या मित्राच्या घरी पायी चालत जात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले.
आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालेला आहे. पोलीस चौकशी सुरु आहे, तुमच्या अंगावरील दागिने काढून आमच्याकडे द्या, ते रुमालात व्यवस्थित बांधून देतो अशी बतावणी त्या दोन तरुणांनी केली. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत व्हिक्टोरिया यांनी आपल्या अंगावरील ३१ ग्राम वजनाच्या दोन सोनसाखळ्या काढून तरुणांकडे दिल्या. तरुणांनी रुमालात दागिने बांधत असल्याचे दाखवून तो रुमाल व्हिक्टोरिया यांच्या हातात दिला.
दोघे पुढे चालत जात असताना कुठेच पोलीस किंवा काहीच गडबड दिसत नसल्याने व्हिक्टोरिया यांना संशय आल्याने त्यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यात सोनसाखळ्या नव्हत्या. तरुणांनी मोठ्या हातचलाखीने सोनसाखळ्या लांबवल्या असून, आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्या दोघांना मोठा धक्का बसला.
रविवारी मित्राच्या घरची प्रार्थना आटोपून आपल्या घरी परतल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला घडलेला सगळा प्रकार सांगितला. ज्यानंतर सोमवारी व्हिक्टोरिया यांनी मुलाच्या मदतीने पवई पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली.
‘पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे फसवणुकीचा घडलेला हा पहिलाच गुन्हा आहे, अशा प्रकारे गुन्हे करणारी टोळी आपल्या भागात सक्रिय नाही. आमच्या खबऱ्यांना यासंदर्भात अलर्ट केले असून, सीसीटीव्हीच्या आधारे सुद्धा आम्हाला काही धागेदोरे हाती लागतात का याचा आम्ही शोध घेत आहोत’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.