एका ट्विटने केली कमाल, रिलायन्स एनर्जीने झाकला आपला खुला माल

साकिनाका इन्फोलाईनच्या ट्विटचा स्क्रिनशॉट

सोशल मिडिया आजच्या युगातले सगळ्यात प्रभावी माध्यम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हिरानंदानी येथील एसएम शेट्टी शाळेजवळ रस्त्यावरील दिव्याच्या खांबावरील वीजपुरवठा करणाऱ्या वायरींचा संच बॉक्स खुला असल्याचे साकीनाका इन्फो लाईन (@sakinakainfo) या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून यामुळे धोका असल्याबाबत लक्ष वेधले होते. याचीच दखल घेत रिलायन्स एनर्जी या वीजपुरवठा करणाऱ्या संस्थेने त्वरित सदर बॉक्स झाकून घेतला आहे.

साकीनाका आणि आसपासच्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साकीनाका इन्फो लाईन या ट्विटर अकाऊंटवरून ४ जुलैला सकाळी ११.५९ वाजता एस एम शेट्टी शाळेच्या गेट क्रमांक २ जवळ असणाऱ्या दिव्याच्या खांबावर असणारा वीजपुरवठा करणाऱ्या वायरींचा बॉक्स खुला असल्याबाबत ट्विट करण्यात आले होते.

खुल्या असणाऱ्या विजेच्या वायरींच्या बॉक्सपासून काही मीटरच्या अंतरावर एस एम शेट्टी शाळेतून विद्यार्थ्यांना प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी असणारे गेट आहे. सदर बॉक्समधील वायरींमध्ये वीजपुरवठा चालू असल्यास येथून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विजेचा धक्का लागण्याची शक्यता असल्याकडे या ट्विटने लक्ष वेधले होते.


दुपारी १२.२२ वाजता रिलायन्स एनर्जी या वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या @Reliance_Energy या अकाऊंटवरून प्रतिसाद मिळून, उघड्या असणाऱ्या बॉक्सच्या ठिकाणाबाबत त्यांच्याकडून खात्री करून घेण्यात आली. ज्यानंतर संध्याकाळी ८.२४ वाजता त्याच ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून सदर खुला असणारा बॉक्स हा बंद करण्यात आल्याचे फोटो टाकून रिलायन्स एनर्जी या वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीकडून माहिती देण्यात आली.

एका ट्विटने संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून घेत ८ तासाच्या आत संबंधित धोक्याचे निवारण झाल्याने सोशल मिडियाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!