पवईतील आयआयटी भागात असणाऱ्या ज्ञान विद्यामंदिर शाळेच्या छताचा काही भाग कोसळून शाळेत असणारे ४ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सोमवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी पवईत घडली. शाळेने त्वरित विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार करून पालकांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे पालकांच्यात नाराजी असून, वेळच्या वेळी विद्यार्थ्यांकडून फी उकळणारे शाळा प्रशासन इमारतीच्या डागडुजीत कानाडोळा करत असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे.
या संदर्भात पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील आयआयटी भागात असणाऱ्या ज्ञान विद्यामंदिर शाळेत येथील स्थानिक भागातील बरेच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दीपावली आता काहीच दिवसांवर आली असून, विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा सुरु आहेत. सोमवारी या शाळेतील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु असताना, शाळेच्या तळमजल्यावर असणाऱ्या एका वर्गातील छताच्या भागाचा पापुंद्रा वर्गात बसलेल्या दोन विद्यार्थ्यांवर पडल्याची घटना घडली. या घटनेत दोन विद्यार्थ्यांना डोक्याला मार लागला असून, त्यातील एका विद्यार्थ्याला ४ टाके पडल्याची माहिती पवई रुग्णालयातून देण्यात आली. दोन विद्यार्थी किरकोळ जखमी असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
“आमच्याकडून ऐन परिक्षेच्या काळात शाळा जबरदस्ती फी वसूल करत असते, मात्र याच शाळेच्या डागडुजी आणि देखभालीत मात्र शाळा प्रशासनाची तेवढी काळजी असताना दिसत नाही. या त्यांच्या निष्काळजीपणामुळेच आज आमची मुले जखमी झाली आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षणासाठी पाठवतो कि जखमी होण्यासाठी हाच आता आम्हाला प्रश्न पडू लागला आहे, असे जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
ही शाळेत घडलेली अपघाताची पहिली घटना नाही, यापूर्वीही शाळेच्या मीटरबॉक्सला आग लागल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. त्यामुळे या अशा वारंवार घालणाऱ्या घटना ह्या केवळ शाळा प्रशासनाच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळेच घडत असल्याचा आरोप सुद्धा पालकांकडून होत आहे.
या संदर्भात शाळेच्या संचालक मंडळातील श्रीनिवास त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “होळीच्या काळातच आम्ही शाळेच्या दुरुस्तीचे आणि डागडुजीचे काम केले होते. आम्ही शाळेच्या बांधकामाची वेळोवेळी पाहणी करत असतो. सोमवारी घडलेल्या घटनेमागचे नक्की कारण काय? याबाबत आम्ही माहिती मिळवत आहोत. घटनेची जबाबदारी स्वीकारतानाच, आम्ही दिवाळीत पुन्हा एकदा संपूर्ण शाळेच्या बांधकामाची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करणार आहोत, असे याबाबत बोलताना सांगितले.
No comments yet.