कल्याण पूर्व येथील दोन एटीएम फोडून २७ लाख रुपये चोरणारे कुशल आणि हायटेक चोर आपल्या सहकाऱ्यांना चोरीचे मार्गदर्शन करण्यासाठी हरियाणामधून विमानाने मुंबईत आणि तेथून कल्याणमध्ये आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी साकीनाका येथून एकाला अटक केली आहे. सरफुद्दीन खान असे साकीनाका येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
चोरीच्या प्रकरणात अडकू नये आणि पकडले जाऊ नये म्हणून हे हायटेक चोर मोबाईलवर बोलताना वेब लिंकच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत होते. हे चोर कुशल तंत्रज्ञ असल्याने या चोरांचा म्होरक्या नक्की कोण? या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
एटीएम चोरीनंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी साकीनाका येथून सरफुद्दीन खान याला तर शिळफाटा परिसरातून उमेश प्रजापतीलाअटक केली आहे. ही चोरी करण्यापूर्वी उमेश आणि सरफुद्दीनला एटीएममध्ये चोरी कशी करायची, एटीएम फोडण्यासाठी कोणत्या हत्यार आणि तंत्राचा वापर करायचा याची माहिती देण्यासाठी हरियाणा येथून चार कुशल तंत्रज्ञ चोर विमानाने मुंबईत आले होते.
मुंबईत आल्यानंतर ते मुंबई येथील आपल्या साथीदारांसह लोकलने कल्याणला पोहचले आणि मध्यरात्रीच्या वेळेत एका खोलीतील दोन एटीएम फोडून २७ लाख ६७ हजार रुपयांची रक्कम चोरली. काही रक्कम आपल्याला देऊन उर्वरित रक्कम घेऊन चारही चोर पुन्हा विमानाने हरियाणाला रवाना झाले असल्याची माहिती अटक आरोपींनी पोलिसांना दिली.
हे कुशल तंत्रज्ञ हायटेक चोर नक्की कोण आहेत आणि कोणत्या विमानाने ते चार चोर पुन्हा हरियाणाला गेले याची माहिती पोलीस घेत आहेत.
No comments yet.