सुषमा चव्हाण | संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात असताना लॉकडाऊनमुळे घरी अडकून असणाऱ्या लोकांना कोरोनाची प्रत्येक अपडेट आणि बाहेरील जगातील बित्तम बातमी देणाऱ्या पत्रकारांना चेतनने आपल्या कलेतून मानवंदना दिली आहे. माध्यमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्रकार आणि छायाचित्रकार यांची पोर्ट्रेट त्याने ३ मे ‘जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस’निमित्त साकारली आहेत. ४ हजार ८६० पुश पिनचा वापर करून चेतनने ही पोर्ट्रेटस साकारली आहेत. ३० बाय १८ इंचाचे हे पोर्ट्रेट आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि शासकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडण्यास मनाई आहे. यामुळे बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क हा काहीसा तुटलेला आहे. अशावेळी कोरोनाचे प्रत्येक अपडेट देण्याचे काम विविध माध्यमातील पत्रकार करत आहेत.
पत्रकार कोरोना बाधित मिळत असणाऱ्या ठिकाणी जावून तिथली स्थिती आणि शासकीय कार्यालये, अधिकृत माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात राहत प्रत्येक क्षणाची माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहेत. अशावेळी पत्रकारांना आपल्या परिवारासोबतचे क्षण सुद्धा गमवावे लागले आहेत. शिवाय या विषाणूंच्या विळख्यात सुद्धा अडकावे लागले आहे. एकट्या मुंबई शहरात ५३ पेक्षा अधिक पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यातील अनेक जण आता बरे होऊन आपआपल्या घरी परतले आहेत. मात्र अजूनही त्यांची लढाई संपलेली नाही.
हे सुद्धा वाचा: प्राध्यापकांच्या मित्राचा इमेल हॅक करून, २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
“कुणी सांगितले होते बाहेर फिरायला. झाला ना कोरोना. आता इथे आलात तर आम्हालाही होणार, इथे थांबू नका.” असे अपमानाचे बोल यातील काहींना सहन करावे लागत आहेत. नाविलाजास्तव त्यांना आपले घर आणि परिवार सोडून दूर अलगीकरणात राहावे लागत आहे. मात्र देश आणि आपला परिसर या संकटापासून वाचावा म्हणून आनंदाने त्यांनी हे सुद्धा स्वीकारले आहे. पत्रकार यांच्या या त्यागाचे कौतुक आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी चेतनने पत्रकारांना मानवंदना देण्यासाठी ही पोर्ट्रेट साकारली आहेत.
राऊतने यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रतन टाटा, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, अक्षय कुमार, सचिन तेंडूलकर यांचे पोर्ट्रेट चित्र रेखाटून कोरोना संकटात त्यांच्याही कार्याचे कौतुक केले आहे.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.