पावसाळ्यात पालिकेने बनवलेल्या रस्त्यांवर खड्डे पडणे मुंबईकरांसाठी नवीन नाही आहे, मात्र पाऊस नसतानासुद्धा नुकत्याच दुरुस्तीचे काम केलेल्या विजय विहार रस्त्याला खड्डे पडल्याचा प्रकार घडला आहे. येथील विजय विहार ते पवई विहार जोडणाऱ्या रस्त्याला महिना भराच्या आतच खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी आमदार नसीम खान यांच्या प्रयत्नाने महानगर पालिकेच्यावतीने या रोडच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र महिन्याभरातच रस्त्याला पडलेल्या खड्यांमुळे पालिकेच्या ढिसाळ कामाचे पितळ यामुळे उघडे पडले आहे.
पवईचा गेल्या २ दशकात झालेल्या विकास कामाच्या दुसऱ्या टप्याच्या दिवसातच पवई विहार जवळील एका मोठ्या जमिनीवर मुंबईतील नामांकित विकासकाने आपला नवीन प्रोजेक्ट सुरु केला होता. या भागाच्या विकासामुळे हिरानंदानी आणि पवई विहार हे दोन्ही परिसर एकमेकांना जोडले जाणार होते. मात्र विकासक व गुंतवणूकदार यांच्यातील अंतर्गत वाद आणि कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यात अडकून पडल्याने हा प्रोजेक्ट तर रखडलाच, परिसराचा विकास हि रखडला. या सगळ्या प्रकरणात रस्ता नसल्याने गेल्या दहा ते बारा वर्षात मात्र या दोन्ही परिसरात राहणाऱ्या व प्रवास करणाऱ्या लोकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत होता.
याबाबत सरकार आणि पालिका दरबारी सतत फेऱ्या मारल्यानंतर, अखेर पावसाळ्यापूर्वी स्थानिक आमदार नसीम खान यांनी परिसराच्या पाहणीनंतर पाठपुरावा करून पालिकेकडून या रोडच्या दुरुस्तीचे काम करून घेतले होते.
प्रत्येक वर्षी या रोडवर असणाऱ्या खड्यांना भरून दुरुस्तीचे काम केले जाते, मात्र पहिल्या पावसातच संपूर्ण रस्ता धुवून जावून परिस्थिती जैसे थी होत असे. मात्र, यावर्षी दुरुस्तीच्या कामामुळे सुरवातीला झालेल्या पावसात रस्त्याने तग धरल्याने यावर्षी रस्त्याला खड्डे नाही पडणार असे वाटत असतानाच पाऊस थांबलेला असतानाही या रस्त्याला अनेक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले आहेत.
“रस्त्याला पडणारे खड्डे हे पालिकेच्या ठिसाळ कामाचे प्रतिक आहेत. जर असे बांधकामच करायचे असेल तर रस्ते दुरुस्त न-केलेलेच बरे, मुंबईकरांच्या टक्सचे पैसे एकच काम परत परत करण्यात कशाला वाया घालवा.” असे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना स्थानिक रहिवाश्यांनी सांगितले.
याबाबत पालिका ‘एस’ विभागाला फोनवरून तक्रार केली असता ‘आम्ही येवून पाहणी करतो’ असे उत्तर देण्यात आले आहे.
No comments yet.