एफडीए अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या एकाला पवईत अटक

अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) अधिकाऱ्याची बतावणी करून जनरल स्टोअर मालकाची फसवणूक करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या ३१ वर्षीय व्यक्तीला शनिवारी पवई पोलिसांनी अटक केली आहे. वर्धन रमेश साळुंके असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो कांदिवली पूर्वेकडील रहिवासी असून, ड्रायव्हर म्हणून काम करतो.

यासंदर्भात पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम २०४ (सार्वजनिक सेवक असल्याचे भासवणे), ३१९ (बनावटपणा करून फसवणूक), ३३६(२) (बनावटपणा) आणि ३४०(२) (खरे म्हणून बनावट कागदपत्र वापरणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार किरण पटेल पवईतील तुंगागाव येथे एक जनरल स्टोअर चालवतात. शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास, एक माणूस पटेल यांच्या दुकानात आला, त्याने ओळखपत्र दाखवत स्वतःची (एफडीए) अन्न निरीक्षक म्हणून ओळख करून दिली. “त्याने पटेल यांच्या दुकानाचा परवाना पाहण्याची मागणी केली.” असे पोलिसांनी सांगितले.

हे सर्व सुरु असतानाच त्याच क्षणी पटेलचे दोन ओळखीचे व्यक्ती, समशेर यादव आणि भावेन भसीन जे दोघेही बीएमसी मार्शल होते ते तेथे आले. हे सर्व संभाषण ऐकत असताना संशय आल्याने त्यांनी त्या व्यक्तीला विचारणा केली असता तो स्पष्ट उत्तरे देऊ शकला नाही.

पटेल यांनी त्या व्यक्तीकडे पुन्हा ओळखपत्र दाखवण्याची मागणी केली. मात्र, आपले पितळ उघडे होत असल्याचे पाहताच त्या व्यक्तीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र भसीन आणि यादव यांच्या मदतीने पटेल यांनी त्याला पकडून पवई पोलिसांच्या स्वाधीन केले.

“चौकशीदरम्यान, आरोपी याचे नाव वर्धन रमेश साळुंखे असून, तो कांदिवली येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. साळुंखे हा एफडीए अधिकारी नाही. त्याने अक्षय पाटील नामक व्यक्तीचे बनावट ओळखपत्र तयार करून तो तसे भासवून व्यावसायिकांकडून पैसे उकळण्याचा त्याचा हेतू होता, परंतु ते करण्यापूर्वीच तो पकडला गेला. त्याने यापूर्वी अशा प्रकारे इतरही काही लोकांना फसवले आहे का? याचा आम्ही तपास करत आहोत,” असे पवई पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!