चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयाच्या १,७०,६१,५०० रुपये किमतीच्या जुन्या नोटा बाळगल्या प्रकरणी जुहू एटीएस व पवई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत व्यावसायिक अजय राजेंद्रप्रसाद गुप्ता (३६) याला रविवारी अटक केली. साकीविहार रोडवरील सोलारीस इमारतीत असणाऱ्या त्याच्या कार्यालयात छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली. कोर्टात हजर केले असता त्याला जामीन देण्यात आला आहे.
“अजय गुप्ता याचे सोलारीस इमारतीत युनिवर्सल इन्फोटेक वेन्चुअर्स नामक कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटांचा मोठा साठा ठेवला असल्याची माहिती आम्हाला आमच्या सूत्रांकडून मिळाली होती. याच माहितीच्या आधारे आम्ही कार्यालयावर छापा मारला असता, पाचशे व हजार रुपयांच्या १.७ करोडच्या नोटा आम्हास मिळून आल्या आहेत” असे आवर्तन पवईशी बोलताना छाप्यात सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
मार्च ३१ पर्यंत रक्कम जमा करण्यास मुभा असल्याने ३१ तारखेला आरबीआयमध्ये तो ही रक्कम भरण्यास गेला होता. मात्र, संध्याकाळपर्यंत त्याचा नंबर आला नसल्यामुळे आणि रक्कम जमा करण्याची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती मिळाल्याने ती रक्कम घेवून तो परत आला. असे गुप्ता याने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
“याबाबत पवई पोलीस अधिक तपास करत असून, गुप्ताजवळ मिळून आलेल्या रकमेची माहिती इन्कमटॅक्स डिपार्टमेंटला सुद्धा देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी मुंबई पोलीस कायद्याच्या कलमांसह नोटबंदीनंतर लागू करण्यात आलेल्या काळा पैसा विरोधी कायद्याच्या कलमाची बेडीसुद्धा गुप्ताना घातली आहे. या कायद्यानुसार आरोप सिद्ध झाल्यास सापडलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.
No comments yet.