पेट्रोल आणि डिझेल महागले असताना एवढे महाग इंधन खरेदी करणाऱ्या लोकांमध्ये मिठाई वाटून कॉंग्रेसचा निषेध. सरकार मोठ्या प्रमाणात आकारत असलेल्या कराबाबत लोकांमध्ये जनजागृती
केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात सोमवार, १२ जुलै रोजी विक्रोळी तालुका कॉंग्रेस आणि वॉर्ड १२२च्या वतीने पवईतील आयआयटी मेनगेट येथील पेट्रोल पंपाजवळ निषेध करण्यात आला. लोकांना इंधनासाठी किती जास्त प्रमाणात कर भरावा लागला आहे याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने हा निषेध करण्यात आला. मोठ्या संख्येने पवईकर या निषेधात सहभागी झाले होते.
“मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर एक लिटरमागे १०७ रुपये आणि ९८ रुपये झाले आहेत. इंधनाच्या किंमतीत झालेल्या या वाढीमुळे नागरिकांमध्ये भाजपा सरकार विरोधात रोष आहे. कोरोना सारख्या साथीच्या आजाराने संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. शेकडो लोकांनी नोकर्या गमावल्या आहेत, तर काहींनी आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्तीच गमावला आहे. देश एवढ्या मोठ्या दुःखाच्या ओझ्याखाली असताना केंद्र सरकार मात्र मोठ्या प्रमाणात कर वाढवत लोकांच्या तोंडचा घास पळवण्याच्या मागे लागले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावरून प्रवास करून आपल्या इच्छित स्थळी पोहचण्याचा एकमेव मार्ग सध्या उपलब्ध असतानाच इंधनाच्या किंमतीनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे,” असे यावेळी बोलताना कॉंग्रेस पदाधिकाऱ्यानी सांगितले.
सर्वसामान्यांची ही दुर्दशा दर्शविण्यासाठी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष व विधानपरिषदेचे सदस्य भाई जगताप, एमआरसीसीचे कार्यकारी अध्यक्ष चरणसिंग सप्रा, उत्तर-पूर्व जिल्हाध्यक्ष-अब्राहम रॉय मणी यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी तालुका कॉंग्रेस आणि वॉर्ड १२२ कॉंग्रेस पदाधिकारी यांनी पवईमध्ये निषेध नोंदवला. यावेळी येथील पेट्रोल पंपावर एवढे महाग पेट्रोल भरणाऱ्या नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले. तसेच त्यांनी भरलेल्या पेट्रोलच्या किंमतीवर आकारण्यात आलेल्या कराची रक्कम त्यांना देत किती मोठ्या प्रमाणात सरकार कर आकारात आहे याबाबत जनजागृती केली.
‘अब की बार पेट्रोल १०० रुपये पार’, ‘पेट्रोल-डिझेल मे लगी है आग – सो रहीं हैं मोदी सरकार’ अशा घोषणा सुद्धा यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ देण्यात आल्या.
“आम्ही अशा प्रकारे प्रथमच निषेध केला आहे. लोक येथे येत आहेत, इंधन खरेदी करीत आहेत, मिठाई घेत आहेत आणि इंधनावरील शुल्काबद्दल समजत आहेत. लोकांमध्ये एकतेची भावना दिसत आहे, जी खरोखर काहीतरी अनन्य गोष्ट आहे,” असे निषेधकर्ते यावेळी बोलताना म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “ही दुर्दैवी गोष्ट आहे की साथीच्या रोगाने आधीच सामान्य नागरिकांना खूप त्रास दिला आहे. अनेक लोक दिवसातून एकवेळ जेवण मिळवण्यासाठी धडपडत आहेत. त्यातच आता एक लिटर इंधनासाठी एवढी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने साहजिकच आपल्या आणि आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी प्रवास करणाऱ्या त्या सामान्य नागरिकाच्या खिशाला कात्री बसणार आहे. आमची सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे की त्यांनी याविषयी काहीतरी करावे आणि भारताच्या लोकांना मदत करावी.”
No comments yet.