विमा कंपनीसाठी काम करणाऱ्या ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करणे आणि ब्लॅकमेल प्रकरणी पवई पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ४८ वर्षीय पोलीस शिपायाला शनिवारी रात्री बेड्या ठोकल्या आहेत. मधुकर आव्हाड असे अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. सतत फोन करून ब्लॅकमेल करून हॉटेलमध्ये बलात्कार केल्याची तक्रार पिडीत महिलेने पवई पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पवई पोलिसांनी अटकेची कारवाई केली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारीच्या संध्याकाळी काम संपल्यानंतर घरी परतत असताना तिने हिरानंदानी येथील सुपरमार्केटमधून किरकोळ खरेदी केली. खरेदी पूर्ण झाल्यानंतर तिने १० चॉकलेट बार तिच्या पर्समध्ये ठेवले. सुपरमार्केटमधून बाहेर पडताना सुरक्षा रक्षकाने तिला थांबवून तिच्या पर्सची तपासणी केली असता चॉकलेटस तिच्या पर्समध्ये सापडले, ज्याची नोंद तिच्या बिलात झालेली नव्हती. तिला स्टोअर मनेजरकडे सोपवून पोलिसांना याबाबत वर्दी देण्यात आली.
पोलीस शिपाई आव्हाड यावेळी तिथे पोहचला. त्याच्या उपस्थितीतच ‘मॉल प्रशासनाने तिच्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही असा जवाब लिहून घेत तिचे ओळखपत्र आधार कार्डसह दोन झेरॉक्स प्रती बनवल्या. यातील एक प्रत पोलीस शिपाई आव्हाडला सोपवण्यात आली, ज्यावर त्याने महिलेचा नंबर लिहून घेतला. मॉल प्रशासनाची माफी मागितल्यावर महिलेने घेतलेल्या चॉकलेटच्या किमतीची रक्कम भरणा करून घेवून तिला सोडून देण्यात आले’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
दुसऱ्या दिवशी आव्हाडने सकाळपासून मला जवळपास तीन कॉल केले, मात्र मी ते स्विकारले नाहीत. मात्र २.४५ वाजण्याच्या सुमारास त्याने जेव्हा चौथा कॉल केला, तो मी स्वीकारला, ‘तुला काय वाटले तू सुटलीस, तुझा जवाब अजूनही माझ्याकडे आहे आणि मी काहीही करू शकतो’ असे मला त्याने धमकावले. मात्र, मी कामात होते आणि घाबरले म्हणून मी फोन घेतला नाही असे मी त्याला सांगितल्यावर त्याने मला भेटायला बोलावले. तेव्हा मी उद्या भेटते असे सांगितले. असे तक्रारदार महिलेने पवई पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
‘८ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता तिला आव्हाडचा फोन आला मात्र महिलेने तो उचलला नाही, तेव्हा त्याने तिला व्हाट्स-अपवर दुकानातील चोरीबद्दल तुझ्या घरी भेटून तुझ्या आई-वडिलांना सांगावे लागेल असा संदेश पाठवला’ असे याबाबत बोलताना अजून एक अधिकाऱ्याने सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘त्यानंतर त्याने तिला आणखी एक कॉल करून तो पवई येथील एमटीएनएल गेटजवळ बऱ्याच वेळापासून उभा असून, भेटून एकदाचे प्रकरण मिटवूया असे सांगितले. जेव्हा ती तिथे पोहचली तेव्हा त्याने आपल्या मोटारसायकलवर बसायला सांगून तिला आरे कॉलनीतील एका हॉटेलला आणले. तिथे त्याने दोघांचे आधारकार्ड ओळखपत्र म्हणून देत एक रूम बुक केली.
आव्हाड रुमच्या बाथरूममध्ये असताना हॉटेल कर्मचाऱ्याने त्यांचे आधार कार्ड आणून दिले. ज्याचा फायदा घेत मी त्याच्या आधार कार्डचा आणि स्वतःचा सेल्फी फोटो पुरावा म्हणून तिथे घेतला. आव्हाडने बाहेर आल्यावर ‘तू माझ्याशी संबंध बनव, मी तुला पुन्हा कधीच सतावणार नाही ‘अशी माझ्यावर जबरदस्ती केली. ज्याच्यानंतर त्याने निघताना अधिक काळासाठी पुन्हा एकदा भेटण्याची धमकीही दिली. असेही तक्रारदार महिलेने पोलीस जवाबात म्हटले आहे.
९ फेब्रुवारीला पीडित महिलेचा पती तिच्या फोनमध्ये काहीतरी पाहत असताना त्याला हॉटेलमध्ये घेतलेले सेल्फी आणि फोटो दिसले. ज्याबाबत त्याने विचारणा केली असता महिलेने घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितल्यावर जोडप्याने पवई पोलीस ठाण्यात जावून या प्रकरणात तक्रार दाखल केली.
‘धमकावणे, ब्लॅकमेल करणे आणि बलात्काराचा गुन्हा नोंद करून पिडीत महिलेच्या जवाबाच्या आधारावर आम्ही आरोपी पोलीस शिपायाला अटक केली आहे. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजसह इतर तांत्रिक पुरावे आम्ही जमा करत आहोत’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.