स्थानिकांचा विरोध आणि भावनिक गुंतागुंतीत अडकून पडलेल्या पवईतील हनुमान रोडवरील मारुती मंदिरावर आज अखेर पालिकेने कडक पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण मंदिर पाडण्यात आले आहे. मंदिरावरील कारवाईमुळे स्थानिक जनता भडकली असून, मोठी मोठी आश्वासने देणारी नेतेमंडळी आज गेली कुठे? असा प्रश्न उपस्थित करत ते याच्या विरोधात त्यांच्या कार्यालयांवर आज मोर्चा काढणार आहेत.
सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर पवईतील आदिशंकराचार्य मार्ग आणि हनुमान रोड या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या मारुती मंदिरांना अनधिकृत ठरवत पालिकेने हटवण्याची नोटीस दिली होती. ‘हटवले गेले नाही तर पालिका निष्कासनाची कारवाई करेल’ असेही या नोटीसित स्पष्ट करण्यात आले होते. मात्र लोकांच्या या मंदिरांशी जोडल्या गेलेल्या भावना विचारात घेता काही काळ दोन्ही ठिकाणच्या कारवाई पुढे ढकलत मंदिर हलवण्यासाठी वेळ देण्यात आला होता.
अखेर आज सकाळी संपूर्ण फौजफाट्यासह येत आणि पवई पोलिसांच्या कडक बंदोबस्तात पालिकेने मंदिरावर निष्कासनाची कारवाई केली.
या कारवाईमुळे जनतेच्या भावनांना ठेस पोहचली असून, कारवाई रोखण्याची आश्वासने देणाऱ्या जननेत्यांच्या कार्यालयांवर स्थानिक जनता कारवाईचा निषेध म्हणून संध्याकाळी मोर्चा घेवून जाणार असल्याचेही काही नागरिकांनी यावेळी बोलताना सांगितले.
No comments yet.