पवईतील आयआयटी येथे हाफ मॅरेथॉनसाठी आलेल्या धावपटूंच्या जवळपास १२ वाहनांच्या काचा फोडल्याची घटना आज सकाळी पवईत घडली आहे. यावेळी चोरट्यांनी गाडीतील लॅपटॉप, मोबाईल, बॅग अशा मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
पवईतील आयआयटी इन्स्टिट्यूटमध्ये आज (रविवारी) सकाळी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी येथील विद्यार्थ्यांसह, पवई आणि मुंबईभरातून अनेक धावपटू येथे आले होते. बाहेरील वाहनांमुळे कॅम्पस परिसरात गर्दी निर्माण होण्याची शक्यता असल्याने, त्यांना सुरक्षा भिंतीच्या बाहेर सर्विस रोडवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.
संधीच्या शोधात असणाऱ्या चोरट्यांनी हिच संधी साधत, मॅरेथॉनसाठी आलेल्या लोकांच्या पंचकुटीर ते आयआयटी मार्केट गेट जवळच्या भागात पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून महागड्या वस्तूंची चोरी केली आहे.
‘मॅरेथॉनवरून परतल्यानंतर गाड्यांच्या काचा फोडून त्यांच्या गाडीतील मौल्यवान वस्तू गायब असल्याचे वाहनधारकांच्या लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. आतापर्यंत जवळपास १२-१५ लोकांनी याबाबत तक्रार दिल्या असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमचा शोध सुरु आहे,’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.