पाठीमागील काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्याने पवई तलाव शनिवारी संध्याकाळी ओसंडून वाहू लागला. मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास २४ दिवस आधीच तलाव भरून ओसंडून वाहू लागला आहे.
मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक असणाऱ्या पवई तलावाची निर्मिती १८९० मध्ये करण्यात आली. मुंबईतील मोठ्या कृत्रिम तलावांपैकी पवई तलाव एक आहे. या तलावाचे पाणी मुख्यत: औद्योगिक कामांसाठी वापरले जाते. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास पवई तलाव ओसंडून वाहू लागल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सांगण्यात येत आहे. पाठीमागील वर्षी ५ जुलै रोजी तलाव भरून ओसंडून वाहू लागला होता. यावर्षी मात्र २४ दिवस आधीच पवई तलाव भरून वाहू लागला आहे.
५४५ कोटी लिटर साठवण्याची क्षमता असलेल्या पवई तलावाची पातळी हळूहळू कमी होत चालली आहे. “मुंबईत सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पवई तलाव ओसंडून वाहू लागल्याचे पालिकेच्या हायड्रॉलिक अभियंता विभागाने सांगितले.
“पवई तलाव भरून वाहू लागला की त्याचे पाणी कॅनॉलमार्गे मिठी नदीला जावून मिळते. सध्या अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत नसले तरी पावसाचा जोर सतत असाच राहिला तर क्षमता वाढू शकते.” असेही याबाबत बोलताना पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे त्यातच हवामान खात्याने (आयएमडी) रविवारी रेड अलर्ट तर १४ जून (सोमवार) रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे. बीएमसीने पुढच्या दोन दिवसांत अतिवृष्टीचा विचार करता सर्व एजन्सीना “हाय अलर्ट” जारी केला आहे. यासर्व गोष्टीकडे पाहता नागरिकांनी तलावावर गर्दी करू नये असे आवाहन पवई पोलीस आणि पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
No comments yet.