पवई परिसरात बसेसमध्ये पाकीटमारी करणाऱ्या टोळीच्या दोन सदस्यांना बुधवारी पवई पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. मोहम्मद आयूब फकीर साहब शेख (५९) आणि गणेश शंकर जाधव (४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हा करून पळून जाण्याच्या तयारीत असताना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्यांना पकडले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना चोरीचे २ मोबाईल मिळून आले आहेत.
मुंबई परिसरात प्रवासात पाकीटमारीचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. २०२१ मध्ये केवळ मुंबई जीआरपी कार्यक्षेत्रात पिक पॉकेटिंगची एकूण २९०८ प्रकरणे आणि बॅग लिफ्टिंगची ७७३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर, २०२० मध्ये पिक पॉकेटिंगची ४३२२ प्रकरणे आणि बॅग लिफ्टिंगची ९०४ प्रकरणे नोंदवली गेली. कधी कोणत्या बसमधून किंवा ट्रेनमधून हे पाकीटमार आपला डाव साधतील हे समजणे अवघड असल्याने पोलिसांना या पाकीटमारांना रोखण्याचे मोठे आव्हान असते.
बुधवारी पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक पवई परिसरात गस्त घालत असताना जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर एल अंड टी बस स्थानकाजवळ एक व्यक्ती चोर-चोर असे ओरडत असल्याचे त्यांनी ऐकले. “त्याचवेळी एक व्यक्ती सिप्झच्या दिशेने जाणाऱ्या बसमधून उतरून घाईगडबडीने रस्ता ओलांडताना आम्हाला दिसला. त्याला पाहताच तो अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे आम्ही ओळखले,” असे पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सांगितले.
ते पुढे म्हणाले, “शक्यतो ते एकटे नसतात म्हणून त्याच्या इतर साथीदारासह त्याला पकडण्यासाठी आम्ही त्याच्यावर नजर ठेवून त्याचा पाठलाग सुरु केला. पवई तलावाच्या दिशेने काही अंतर गेल्यावर तो आपल्या अजून एका साथीदारासोबत रिक्षात बसून निघून जाण्याच्या तयारीत असतानाच आमच्या पथकाने रिक्षाला वेढा घालून त्या दोघांना ताब्यात घेतले.”
“त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सॅमसंग जे-७ आणि विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ते मोबाईल बसमधील प्रवाशांचे चोरल्याची कबुली दिली,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकृष्ण हरुगडे यांनी सांगितले.
काही वेळातच संतोष चिनकटे आणि मुकेश कुमार सिंग यांनी बस प्रवासा दरम्यान कोणीतरी त्यांचा मोबाईल चोरी केल्याची तक्रार पवई पोलीस ठाण्यात दिली. त्यांना आरोपींकडून ताब्यात घेतलेले मोबाईल दाखवले असता त्यांनी ते त्यांचेच असल्याचे ओळखले.
गुन्हे प्रकटीकरण पथक पोह. दामू मोहळ, पोना. वैभव पाचपांडे, पोना. प्रवीण सावंत, पोशि. भरत देशमुख, पोशि प्रशांत धुरी, पोशि सुर्यकांत शेट्टी, पोशि भास्कर भोये, मपोशि शीतल लाड यांनी ही कारवाई केली.
या संदर्भात पवई पोलिसांनी भादवि कलम ३७८, ३४ नुसार गुन्हा नोंद करून अटक केली आहे. पवई पोलीस अटक आरोपींचा इतर अजून किती गुन्ह्यात सहभाग आहे याबाबत चौकशी करत आहेत.
No comments yet.