मुंबईतील एका नामांकित अभियांत्रिकी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थीनीला सोशल मीडिया आणि इमेलच्या माध्यमातून मानसिक त्रास देणाऱ्या माजी प्रोफेसरला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने या पीडितेसह अन्य मुलींनादेखील असेच छळले असल्याचे समोर आले आहे.
पवईतील एका नामांकित विश्वविद्यालयाच्या विद्यार्थीनीला सोशल मीडियाच्या माध्यमातून छेडणाऱ्या, तिला अश्लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून तिला मानसिक त्रास देणाऱ्या विश्वविद्यालयाच्या माजी प्रोफेसरला पवई पोलिसांनी शनिवारी सातारा, वाई येथून अटक केली आहे. विजय देशमुख (वय ३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मूळची राजस्थानची असणारी पीडित विद्यार्थीनी २०१५ पासून पवई येथील विश्वविद्यालयात शिक्षण घेत होती. नोव्हेंबर २०१६ रोजी पीडितेला मैत्री जुळवणाऱ्या साईटवर देशमुख याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यावेळी विद्यार्थीनीने त्याला ओळखत नसल्यामुळे त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नव्हती. त्यानंतर “तू माझ्याशी मैत्री करशील का?” असा आशयाचा मॅसेज त्याच प्रोफाईलवरुन तक्रारदार विद्यार्थिनीला मिळाला होता, मात्र तिने याकडे सुद्धा दुर्लक्ष केले होते.
एक दिवस प्रात्यक्षिकांसाठी चार ते पाच विद्यार्थ्यांसोबत संस्थेत असताना, तिच्या समोर देशमुख आला. सोशल मीडियातून आपल्याला मॅसेज पाठवणारा व्यक्ती तोच असल्याचे तिच्या लक्षात आले. ‘तिच्या सोबत असणाऱ्या इतर विद्यार्थिनीनी तो व्यक्ती तिच्याकडे सतत टक लावून बघत असल्याचे तिच्या निदर्शनात आणून दिले’ असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
‘जानेवारीमध्ये आरोपीने पिडीत विद्यार्थिनीला प्रेम कविता पाठवल्यानंतर तिने त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केले होते. त्यानंतर आरोपीने वेगवेगळ्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून विद्यार्थिनीला आक्षेपार्ह संदेश, फोटो, व्हिडीओ पाठवणे सुरूच ठेवले होते. यासाठी त्याने ई-मेलचा वापरही केला होता, असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.
या सगळ्या त्रासाला कंटाळून पीडित विद्यार्थीनीने विश्वविद्यालयाच्या महिला तक्रार केंद्रात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. यावेळी कारवाईचे आश्वासन देतानाच तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांनी तिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची सूचना सुद्धा केली होती.
‘विद्यार्थिनीच्या तक्रारीच्या आधारावर मे २०१८ रोजी त्रास देणाऱ्या देशमुख यांना विश्वविद्यालयातून काढून टाकण्यात आले. जून २०१८ साली पुढील शिक्षणासाठी विद्यार्थिनीला साउथ कोरियाला जाण्याचे असल्याने तिने पोलीस तक्रार करणे टाळले,’ असेही पोलिसांनी पुढे सांगितले.
डिसेंबर २०१८ मध्ये भारतात परतल्यानंतर आरोपीकडून आक्षेपार्ह संदेश येणे सुरूच होते. ज्याबाबत तिने आपल्या मोठ्या भावाला याची माहिती दिल्यानंतर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद केली होती.
पवई पोलिसांनी भादंवि कलम ३५४ (ड), ५०९ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा ६७ नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरु केला होता. ‘अटक आरोपीकडून आम्ही लॅपटॉप, मोबाईल जप्त केला आहे. त्याने पिडीत विद्यार्थिनीला पाठवलेले संदेश त्यात मिळून आले आहेत,’ असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
आरोपीने इतरही विद्यार्थींनींना अश्लील मेसेज करून त्रास दिला असल्याची माहिती सुद्धा समोर आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सातारा, वाई येथील गावातून आरोपीला अटक करून स्थानिक कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
No comments yet.