देश लॉकडाऊन असताना पवई परिसरात गांजा विक्री करणाऱ्या टोळीतील २ आरोपींना पवई पोलिसांनी अटक केली आहे. इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीकडून पवई पोलिसांनी ४०,५०० रुपये किमतीचा १ किलो ७०० ग्राम वजनाचा गांजा आणि रोकड हस्तगत केली आहे.
पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन काळात पवई परिसरात कायदा सुव्यवस्था सुस्थितीत राहावी म्हणून परिसरात नियमित गस्त घातली जात आहे. अशाच प्रकारे पवई पोलीस ठाणे बिट क्रमांक २च्या हद्दीत पवई पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक धामूणसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय लाड, उपनिरीक्षक प्रवीण महामुनी, पोलीस उपनिरीक्षक यादव, म. पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, गुन्हे प्रकटीकरण पथक, गुंडा स्टाफ, सर्वेलंस पथक, महिला अंमलदार रेडेकर, महिला पोलीस हवालदार पाटील, तसेच पोलीस ठाणेत नियुक्त राखीव पोलीस अंमलदार यांचेसह गस्त घालत होते. काही इसम परिसरात गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना खास खबऱ्याकडून मिळाली होती.
“या माहितीच्या अनुषंगाने मोरारजीनगर येथे छापा मारत आरोपी नामे अजगरी बेगम सय्यद अली (६५), यास्मीन मोहम्मद इब्राहीम शहा (३७), प्रदीप उर्फ पद्या गौतम शिरवाडे (३०) आणि वाकित जावेद सई मोहम्मद खान (२८) यांच्याजवळ १ किलो ७०० ग्रॅम वजनाचा गांजा ज्याची अंदाजे किंमत ४०,५०० रुपये आहे पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच यांच्याकडे ३८ हजार ८५० रुपये रोख रक्कम सुद्धा मिळून आली आहे.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
“यासंदर्भात त्यांच्याविरोधात विशेष स्थानिक गुन्हा क्रमांक ४४/१९ अमली पदार्थ कायदा १९८५ कलम ८ क २० अन्वये गुन्हा नोंद करून यातील दोघा आरोपींना आम्ही अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.” असे याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक यादव यांनी सांगितले.
यातील आरोपी अजगरी बेगम सय्यद अली (६५) हिच्या विरोधात यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्याची नोंद असून, तिला अशा प्रकारच्या गुन्ह्यात यापूर्वीही अटक करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
No comments yet.