पवई परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका तरुणाला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. संकेत रामचंद्र गोरे (वय २० वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरु असून, मुंबईत अजून कोठे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत.
फिर्यादी नामे अतिन विकास सरगले हे गोरेगाव येथे राहतात. २०१२ साली त्यांच्या आजोबांच्या निधनानंतर त्यांच्या पवई येथील राहते घरी ते देखभालीसाठी अधून-मधून येत असत. ३ एप्रिल रोजी ते पवई येथे आले होते. ०९ एप्रिल रोजी परत जात असताना तिरंदाज व्हिलेज ब्लु हेवन इमारतीजवळ पार्क केलेली त्यांची मोटारसायकल त्यांना मिळून आली नाही. ती चोरी झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात याबाबत भादवि कलम ३७९ अनव्ये मोटार सायकल चोरीचा गुन्हा नोंद केला होता.
“सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यावरून पोलीस ठाणाच्या अभिलेखावरील आरोपी नामे संकेत गोरे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे,” असे याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकृष्ण हारूगडे यांनी सांगितले.
“आरोपीकडून चोरीस गेलेली मोटारसायकल क्र. एमएच ४७ झेड ०१५० (अंदाजे किंमत रु. ३५,०००) हस्तगत करण्यात आली आहे”, असे यासंदर्भात बोलताना पवई पोलिसांच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकृष्ण हारूगडे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उप निरीक्षक विनोद लाड व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी पार पाडली.
No comments yet.