पवईतील तुंगागाव येथील एका रहिवाशी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काल पवईत समोर आला आहे. इमारतीच्या पार्किंग परिसरात सुरक्षा रक्षक रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना मिळून आला होता. या संदर्भात पवई पोलिसांनी भादंवि कलाम ३०२नुसार गुन्हा नोंद केला असून, इमारतीच्या लिफ्ट ऑपरेटरने हा खून केला असल्याची माहिती मिळत असून, पवई पोलीस पाहिजे आरोपीचा शोध घेत आहेत.
नालासोपारा येथे राहणार अंकित (रिषभ) देवीप्रसाद सिंग (२४) काही दिवसांपूर्वीच साकीविहार रोड येथील लोढा सुप्रीम पार्क येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत झाला होता. रविवारी नेहमीप्रमाणे तो आपल्या कर्तव्यावर असताना रात्री २.२० वाजण्याच्या सुमारास इमारतीत असणाऱ्या इतर सहकाऱ्यांना तो पार्किंग परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ‘त्याच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. सोबतच त्याच्या गुप्तांगावर सुद्धा काही घाव मिळून आले आहेत. त्यामुळे त्याच्या हत्येमागचे गूढ वाढले आहे,’ असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
‘आम्ही भादंवि कलम ३०२ (खून) नुसार गुन्हा नोंद करून, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे,’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले यांनी सांगितले.
घटनेच्या ठिकाणापासून काहीच चोरीला गेले नाही. ‘त्याच्या सहकाऱ्यांच्या चौकशीतून इमारतीचा लिफ्ट ऑपरेटर अविनाश पांड्ये घटनेच्या दिवसापासून गायब आहे. दोघांच्यातील वादातून हा खून झाला असावा,’ असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.
No comments yet.