आयआयटी पवई येथील मॅरेथॉनवेळी १२ गाड्या फोडून चोरीच्या घडलेल्या गुन्ह्याचे काहीच धागेदोरे हाती लागले नसतानाच, पवईत पुन्हा गाडीच्या काचा फोडून ५ लाखांपेक्षा जास्तीच्या रक्कमेच्या चोरीचा गुन्हा घडला आहे. हिरानंदानीतील वेरोना फ़ाऊंटन येथे दोन तर नोरिटा बस स्टॉप येथे हे गुन्हे घडले आहेत. परिसरात मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पवई पोलिसांनी चोरांचा शोध सुरु केला आहे.
पाठीमागील महिन्यात २६ ऑगस्टला पवईतील आयआयटी इन्स्टिट्यूटमध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक धावपटू येथे आले होते. बाहेरील वाहनांमुळे कॅम्पस परिसरात गर्दी निर्माण होण्याची शक्यता असल्याने, त्यांना सुरक्षा भिंतीच्या बाहेर सर्विस रोडवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. संधीच्या शोधात असणाऱ्या चोरट्यांनी मॅरेथॉनसाठी आलेल्या लोकांच्या पंचकुटीर ते आयआयटी मार्केटगेट भागात पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून महागड्या वस्तूंची चोरी केली होती.
जवळपास १२ ते १५ लोकांनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या आहेत. या गुन्ह्यांचे काहीच धागेदोरे हाती लागले नसतील तोवर १८ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबरला चोरटयांनी पुन्हा डाव साधत तीन वेगवेगळ्या गाड्यांच्या काचा फोडून ५ लाखांपेक्षा जास्त रक्कमेवर हात साफ केला आहे.
१८ सप्टेंबर रोजी हिरानंदानीतील वेरोना फ़ाऊंटन येथे पार्क केलेली पवईकर दिव्येशकुमार सोलंकी यांची फोर्ड इंडिगो कार क्रमांक एमएच ०५ आरई ५१९३ गाडीची डाव्या बाजूची पाठीमागील काच फोडून चोरटयांनी गाडीत ठेवलेली ५ लाखांची रोकड पळवली. याचा गुन्हा नोंद होवून तपास सुरु असतानाच २४ सप्टेंबरला त्याच जागेवर पार्क असणाऱ्या जिगीषा शहा यांच्या होंडा सिविक कारची काच फोडून गाडीतील दोन हजाराची रक्कम चोरटयाने लांबवली. एवढ्यावरच न-थांबता चोरट्याने नोरिटा बस स्टॉपजवळ उभ्या असणाऱ्या मेघा जैन यांच्या एचआर २६ बीयु ८४०६ क्रमांकाच्या कारची काच फोडून दीड हजारच्या रक्कमेसह क्रेडिट कार्ड आणि इत्तर किंमती वस्तूंवर हात साफ केला आहे.
गुन्ह्याची पद्दत
‘पहिल्या गुन्ह्यातील आरोपी हे सराईत असावेत असे दिसतेय. यातील पहिल्या व्यक्तीने रेखी केल्यावर दुसऱ्या व्यक्तीने ग्लास कटरने काच कापल्यावर दोघेही येणाऱ्या जाणाऱ्यावर लोकांवर नजर ठेवून होते आणि तिसऱ्या व्यक्तीने मोका साधत गाडीतील बॅग घेऊन पळ काढला’ असे याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले.
ते पुढे म्हणाले ‘दुसऱ्या आणि तिसऱ्या गुन्ह्यात मात्र आरोपी हा रिक्षातून आलेला असून, रिक्षात बसूनच त्याने दोन्ही गाडयांच्या काचा फोडून गुन्हा केला आहे.
पवई पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणावर उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
No comments yet.