पवई आयआयटीमध्ये रविवारी पहाटे मॅरेथॉनसाठी आलेल्या लोकांच्या रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाड्या चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मॅरेथॉनसाठी आलेल्या धावपटूंच्या जवळपास ५ वाहनांच्या काचा फोडल्याची घटना आज सकाळी पवईत घडली आहे. चोरट्यांनी गाड्याच्या काचा फोडल्यानंतर महागडे मोबाईल, पाकीट तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड लंपास केले आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांना माहिती देण्यात आली असून, ते अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. आज (१३ ऑक्टोबर) रविवारी सकाळी ५ ते ११ या वेळेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी येथील विद्यार्थ्यांसह, पवई आणि मुंबईभरातून अनेक धावपटू येथे आले होते. बाहेरील वाहनांमुळे कॅम्पस परिसरात गर्दी निर्माण होण्याची शक्यता असल्याने, त्यांना एनटीपीसीजवळ पवई तलाव समोरील भागात वाहने उभी करण्याची सोय करण्यात आली होती. ‘मात्र अनेक धावपटूंनी येथे वाहने पार्क न-करता रस्त्यांवर विविध ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे आपली वाहने उभी केली होती,’ असे एका पोलीस अधिकाऱ्याने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
संधीच्या शोधात असणाऱ्या चोरट्यांनी हिच संधी साधत, मॅरेथॉनसाठी आलेल्या लोकांच्या पवई प्लाझा, हिरानंदानी आणि आयआयटी जवळच्या भागात पार्क केलेल्या ५ गाड्यांच्या काचा फोडून महागड्या वस्तू लांबवल्या.
मॅरेथॉनवरून परतल्यानंतर गाड्यांच्या काचा फोडून त्यांच्या गाडीतील मौल्यवान वस्तू गायब असल्याचे वाहनधारकांच्या लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. ‘आम्हाला आत्तापर्यंत फक्त दोन लोकांनी आपल्या गाड्यांच्या काचा फोडून मोबाईल, पाकीट, क्रेडिट – डेबिट कार्ड चोरून नेल्याची माहिती दिली आहे. त्यांनी कोणतीही मौल्यवान वस्तू चोरी झाली नसून तक्रार देण्यास मनाई करत, केवळ हरवलेल्या वस्तूंच्या प्रमाणपत्रांची मागणी केली होती. ज्याची आम्ही पूर्तता केली आहे, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
आयआयटी मॅरेथॉनसाठी आलेल्या धावपटूंसोबत घडलेली ही प्रथम घटना नसून, पाठीमागील वर्षी चोरटयांनी पंचकुटिर ते आयआयटी मार्केट गेट भागात लावलेल्या १२ गाड्यांच्या काचा फोडून गाडीतील लॅपटॉप, मोबाईल, बॅग अशा मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला होता.
‘सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास एका कारचालकाचा काही तरुण मोटारसायकलवरून पाठलाग करत होते. त्यांनी तो चोर असल्याचे सांगितले, असे याबाबत बोलताना काही मॉर्निंग वॊर्कर्सनी सांगितले.
धावताना चक्कर येऊन पडल्याने मृत्य
मॅरेथॉनसाठी आलेल्या एका इसमाचा धावताना चक्कर येऊन पडून मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाड परिसरात राहणारे सुरेश दामू पावडे (४९) हे मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. ते सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास धावत असताना चक्कर येऊन पडले. आयोजकांनी त्यांना त्वरित प्राथमिक उपचार मदत देत हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ‘हृदय विकाराचा त्रास असल्याने २०१२ साली त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या परिवाराने मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यास त्यांना मनाई केली होती, तरीही ते सहभागी झाले होते, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
No comments yet.