पवईतील फिल्टरपाडा येथील जयभिमनगरमध्ये राहणाऱ्या दोन शाळकरी मुलांवर सामुहिक लैंगिक अत्याचार झाल्यानंतर, पिडीत मुलांनी विष घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत पवई पोलिसांनी अनैसर्गिक संबंध आणि पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपी इसमांचा शोध सुरु केला आहे.
८ जुलै रोजी संध्याकाळी शाहीद (११) व सुनील (१३) (दोन्ही बदलेली नावे) ट्युशनला जात असताना परिसरातील ओळखीचा इसम त्यांना आमिष देत एका बंदिस्त ठिकाणी घेवून गेला. जिथे काही मित्रांच्या मदतीने त्यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि याबाबत कोणास सांगितले तर तुमच्या बरोबर तुमच्या परिवाराला सुद्धा संपवेन अशी धमकी देवून त्यांची सुटका केली.
“भेदरलेले दोघे घटनेनंतर तसेच पुढे निघून गेले. ट्युशनमध्ये गेल्यावर ते भेदरलेले दिसत असल्याने शिक्षकांनी काय झाले अशी विचारणा केली असता, ते काहीच बोलले नाहीत. याबाबत शिक्षकांनी पालकांना सुद्धा सूचित केले होते मात्र त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले” असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.
१२ तारखेला रात्री यातील १३ वर्षाचा मुलगा घरात असताना अचानक उलट्या करू लागल्याने त्याच्या वडिलांनी त्याला रुग्णालयात नेले असता त्याने विष प्राशन केले असल्याचे समोर आले. ज्यानंतर त्याच्यावर प्रथम सायन रुग्णालयात आणि आता केईएम रुग्णालयात उपचार सुरु असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
काल त्याला थोडी शुद्ध आल्यानंतर त्याने आपल्या आईला घडलेली सर्व हकीकत सांगितली. भेदरलेल्या दोघांनी त्रासाला कंटाळून विष कडवट लागत असल्याने फ्रुटीमधून घेतल्याची कबुली सुद्धा त्याने यावेळी दिली.
“दुसऱ्या मुलाबाबत माहिती पडल्यावर आम्ही चौकशीसाठी त्याच्या घरी गेलो असता, त्रास जाणवू लागल्याने जोगेश्वरी येथील ट्रोमा रुग्णालयात दाखल करण्यात आले असताना त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.
‘अत्याचार करणारे सर्व इसम हे दारूच्या नशेत होते आणि नशेतच त्यांनी हे सर्व कृत्य केले’ असे यासंदर्भात बोलताना एका पिडतच्या वडिलांनी सांगितले.
११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू हा अत्याचाराने झालेला असतानाही डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. या भोंगळ कारभाराविरोधात चिंता व्यक्त करत, डॉक्टरची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आज त्यांनी केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलाच्या नातेवाईकांची भेट घेतली.
केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे आणि सह अधिष्ठाता डॉ. प्रवीण बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भाटीया हे त्या मुलावर उपचार करत असून, मुलाची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
रुग्णालयात असणाऱ्या मुलाला कडक सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात यावी अशी मागणी सुद्धा आ. निलम गोऱ्हे यांनी यावेळी केली.
“भादवि कलम ३७७ (अनैसर्गिक संबंध) आणि पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध सुरु केला आहे.” असे याबाबत बोलताना पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.
No comments yet.