२६ जानेवारी, देशाच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर संचलनात महाराष्ट्राचे नेतृत्व करताना पवईकर सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी संकल्पित केलेल्या चित्ररथाला सर्वोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे महाराष्ट्रासोबतच पवईच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याचे नेत्रदीपक दर्शन या चित्ररथातून समस्त भारतवासीयांना घडले. चित्ररथात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत असणारा भांडूपचा कलाकार गणेश टिकम लोकांचे प्रमुख आकर्षण ठरला.
अनेक राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रप्रमुखांसहित भारतातील राष्ट्रपती, पंतप्रधान व देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज तसेच असंख्य देशवासीयांच्या उपस्थित दिल्लीच्या राजपथावर भारताचा प्रजासत्ताक दिवस साजरा झाला. आसियान (असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स) या आग्नेय आशियातील १० देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी देशाच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. संचलनात यावर्षी प्रमुख आकर्षण ठरले ते सीमा सुरक्षा दलातील महिला जवानांचे पथक. दुचाकीवर चित्तथरारक कसरती सादर करत त्यांनी स्त्रीशक्तीची झलक दाखवली.
भारताचे लष्करी सामर्थ्या सोबतच भारतीय संस्कृती आणि विविधतेचे दर्शन सुद्धा देशाला घडले. संचलनात कंबोडिया, मलेशिया, थायलंडमधील लोकनृत्यदेखील सादर करण्यात आली. ऑल इंडिया रेडिओ, आयकर विभाग, कृषी विभाग अशा विविध विभागांचे चित्ररथही यावेळी सहभागी झाले होते. याशिवाय देशाच्या विविधतेचे दर्शन घडवणारे विविध राज्यांचे चित्ररथही संचालनात सहभागी झाली होती. मात्र या सर्वात लक्ष वेधून घेणारा ठरला तो महाराष्ट्राचा चित्ररथ. यंदा प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी हा चित्ररथ साकारला होता.
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे जिवंत चित्र त्यांनी जगासमोर उभे केले होते. चित्ररथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जिवंत करण्याचे काम भांडुपकर असलेला गणेश टिकम याने पार पाडले. नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक नरेंद्र विचारे यांनी हे चित्ररथ तयार केले होते. रायगड किल्ल्यावर असलेली ‘मेघडंबारी’ उभारण्यात आली.
“३ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे अमेय पाटील यांच्या भैरीभवानी परफॉर्मिंग आर्ट गृपला कलाकारांचे ऑडिशन्स घेण्याची जबाबदारी दिली होती. यावेळी अनेकांनी माझे नाव सुचवल्यामुळे ऑडिशन्स घेवून चित्ररथातील शिवराय या मुख्य भूमिकेसाठी माझी निवड केली. लहानपणा पासूनच शिवरायांचे कार्य एवढे मनावर बिंबवले गेले आहे कि ते ऑडिशन्सच्या वेळी निघून आले. अनेक महिन्यांच्या सरावानंतर राजपथावर केलेल्या सादरीकरणात अख्ख्या जगाने या कलाकृतीला दाद दिली. हा क्षण माझ्यासाठी अमूल्य असा आहे. एक छोटासा कलाकार दिल्लीत जाऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे खरंच माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे.” असे याबाबत बोलताना गणेश टिकम आपली कृतज्ञता व्यक्त केली.
Jai bhvani jai shivaji
Congratulations