@प्रतिक कांबळे – दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव बघता महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनात जनजागृतीसाठी पवईतील समाजसेवक विलास कुशेर यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी पवई परिसरातील प्रमुख दोन रस्त्यांवर ‘गो कोरोना’ आणि ‘मीच माझा रक्षक’ असा संदेश लिहीत लोकांमध्ये याबाबत जनजागृती केली आहे.
‘महाराष्ट्र शासनाने लॉकआउटचा निर्णय घेत नागरिकांना घरी बसण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत असल्याने त्यांना गल्लोगल्ली आणि पदोपदी याची आठवण करून देण्यासाठी अशा प्रकारे जनजागृती करत आहे,’ असे याबाबत बोलताना कुशेर यांनी सांगितले.
कुशेर हे केवळ रस्त्यावर संदेश लिहून थांबले नसून, आपल्या परिसरात लावण्यासाठी ‘मीच माझा रक्षक’ आणि ‘खुद बचीये, दुसरो को भी बचाईये’ अशा संदेशाचे भले मोठे लाकडी फलक सुद्धा त्यांनी तयार केले आहे. या जनजागृती फलकाच्या माध्यमातून जनतेला त्यांनी स्वतः स्वस्थ रहा आणि इतरांना देखील स्वस्थ राहू द्या! असा संदेश दिला आहे.
कोरोना विषाणू पासून आपले संरक्षण करण्यासाठी आपणच स्वतःच्या स्वास्थ्याची खबरदारी घ्यायला हवी. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधानांनी काल ‘जनता कर्फ्यु’ घोषित केला होता त्याला नागरिकांनी खूप छान प्रतिसाद दिला. मात्र संध्याकाळी ५ वाजता आभारासाठी थाळीनाद करताना आणि आज सकाळपासून घरातून बाहेर पडलेल्या नागरिकांना त्यांच्या या वर्तणामुळे होणारा धोका सांगण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवली आहे.
वाढता प्रसार पाहता शासनाने संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन केला आहे. मात्र अत्यावश्यक सेवा म्हणजेच रूग्णालय, मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला, दुध विक्रेते यांना वगळण्यात आले आहे. मात्र नागरिक या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी त्यांनी हा अनोखा मार्ग निवडल्याचे सुद्धा कुशेर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
No comments yet.