मुंबईच्या रस्त्यावरून चालताना एसी गाडीत बसून प्रशासन आणि पब्लिकला शिव्या घालणारे भरपूर मुंबईकर मिळतील; पण रस्त्यावर उतरून वैयक्तिक सामाजिक जबाबदारी (पर्सनल सोशल रीस्पोन्सिबीलीटी) पाळणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच. चांदिवली येथील रहेजा विहार येथे राहणारे राजेश राजपूत हे त्यापैकीच एक. आपली ही जबाबदारी निभावताना एका वृद्ध महिलेला त्यांनी रस्त्यावर खितपत पडू न देता आसरा मिळवून दिला आहे.
अडचणीत असणाऱ्या प्रत्येक माणसाला मदत करणे हा राजेश यांचा स्वभावाच आहे. मी या समाजाचा एक भाग आहे आणि समाजाचा मी देणे लागतो या नात्याने प्रत्येक क्षणी ते आपली जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न करत असतात. शुक्रवारी सुद्धा त्यांनी आपले हे कर्तव्य जपत एका वृद्ध मानसिक आजारी असणाऱ्या रुग्णाला छत मिळवून दिले.
शुक्रवारी सकाळी राजेश कामानिमित्त जात असताना रहेजा विहार क्रिस्टल सेंटरजवळ एक वृद्ध महिला रस्त्यावर बसलेली आढळून आली. कदाचित शेजारच्या झोपडपट्टीमधील असेल असे समजून ते पुढे निघून गेले. दिवसभर इकडे तिकडे फिरताना जवळपास ४ ते ५ वेळा ते त्या रस्त्यावरून गेले आणि प्रत्येकवेळी ती वृद्ध महिला तिथेच बसलेली आढळून आली. फरक एवढाच पडला होता की, दुपारनंतर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी खायला द्यायला सुरुवात केली होती.
‘रात्रीचे ९.३० वाजले तरी ती महिला तिथेच पडून होती. मी जवळ जावून तिची चौकशी केली तेव्हा ती नालासोपारा येथून आली असल्याचे तिने मला सांगितले. मात्र तिच्या बोलण्याच्या पद्दतीवरून आणि हालचालीवरून ती मानसिक आजारी असावी असे जाणवले. मी आसपासच्या झोपडपट्टीत तिच्याबाबत चौकशी केली, मात्र कोणीच तिला ओळखत नव्हते. तिला कोणीतरी सकाळी आणून सोडले असल्याची माहिती एका सुरक्षारक्षकाने दिली.’ असे याबाबत बोलताना राजेश यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘कॉम्प्लेक्समध्ये या मार्गाने गाड्यांची ये-जा असते, रात्रीच्या वेळेस नजरचुकीने कोणतीही दुर्घटना घडू शकण्याची शक्यता होती. तिला घेवून जाण्यासाठी, मी मित्रांना मानसिक आजारी लोकांना सांभाळणारी कोणती संस्था आहे का? याबाबत विचारणा केली. अनेक संस्थाना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मुंबई पोलिसांच्या १०० नंबरवर माझा संपर्क झाला आणि काही वेळातच पवई पोलिसांच्या एका गाडीवरील पथकाने येवून तिला ताब्यात घेतले.’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ती वृद्ध महिला दक्षतागृहात व्यवस्थित असून, राजेश यांच्या सामाजिक जबाबदारीतून तिला छत मिळाले आहे. प्रत्येक मुंबईकरांनी आपल्या वैयक्तिक सामाजिक जबाबदारीचे पालन केले तर असे अनेक सामाजिक समस्यांचे निवारण होणे नक्कीच सोपे होऊ शकते.
No comments yet.