पवईकर आणि ‘तरुण भारत संवाद’ मुंबई वृत्तपत्राचे उपसंपादक रामकृष्ण खंदारे यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘आप्पा पेंडसे स्मृती पुरस्कार’ २०२१ने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील नागरी समस्यांवरील सर्वोत्कृष्ट वृत्तांकन, स्तंभासाठी खंदारे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. लेखक संदीप वासलेकर यांच्या हस्ते विशेष क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
खंदारे गेली २० वर्ष पत्रकारितेत आहेत. आरोग्य, हवामान आणि पर्यावरण विषयावर ते लिखाण करतात. यापूर्वी पाणी आणि पाऊस या विषयावर त्यांनी केलेल्या लिखाणाबद्दल राज्य शासनाचा ‘श्री. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता २०१३ पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
खंदारे यांच्या या गौरवाबद्दल पवईसह, महाराष्ट्रातील विविध भागातील नागरिकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनेक माध्यमातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
पुरस्कार सोहळ्यात इतर नामवंत पत्रकारांचाही गौरव करण्यात आला. योगेश बिडवई आणि अजय कौटीकवार यांना जयहिंद प्रकाशन पुरस्कार विभागून प्रदान करण्यात आला. कॉम्रेड तु. कृ. सरमळकर पुरस्कार हेमंत साटम, तर चंद्रशेखर कुलकर्णी यांना विद्याधर गोखले ललित लेखन पुरस्कार देण्यात आला आहे. कमलेश सुतार यांना रमेश भोगटे पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट बातम्यांसाठी दिला जाणारा ‘शिवनेर’कार विश्वनाथराव बावळे स्मृती पुरस्कार सुरेश वांदिले यांना सन्मानित करण्यात आले आहे.
No comments yet.