मोटरसायकलवरून जात असताना संतुलन बिघडल्याने बेस्ट बसखाली येऊन एका तरुणाचा मृत्यू, तर एक तरुण जखमी झाल्याची घटना काल साकीनाका खैरानी रोडवर घडली. प्रवीण दिलीप पुजारी (२६) असे मृत तरुणाचे नाव असून, पाठीमागे बसलेला सुमित राजेंद्र चंदनशिवे (१७) हा तरुण जखमी झाला आहे. साकीनाका पोलिसांनी बस चालक तानाजी कुंभार (४१) याला अटक करून कोर्टात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
साकीनाका येथे राहणारे प्रवीण व सुमित हे सकाळी ७.२५ च्या दरम्यान आपली मोटार स्कूटी घेऊन सकाळी बाहेर पडले होते. खैरानी रोडवरील एस. जे. स्टुडिओ जवळून जात असताना घाटकोपर – फिल्टरपाडा या मार्गावर जात असणारी बस मार्ग क्रमांक ४२१ समोर आल्याने बसची टक्कर लागून दोघेही बसखाली येऊन गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता प्रवीणचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर सुमित चंदनशिवे यास प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
या अपघातानंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने बेस्ट बसची तोडफोड केल्याने वातावरण तंग होवून, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी आणि पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणून वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आणली.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडीओ सोशल नेटवर्कवर प्रसिद्ध झाला असून, त्याला पाहिल्यानंतर अनेक मुंबईकर ‘खरी चूक ही मुलांची आहे, ते भरधाव वेगात बस समोर आलेत. या घटनेस सर्वस्वी तेच जबाबदार आहेत,’ अशी प्रतिक्रिया देत आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.