साकीनाका पोलिसांनी एका ६५ वर्षीय एकाकी बेघर वृद्ध महिलेला निवारा मिळवून देत पोलिसांमधील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन घडविले. छत्र हरवल्याने पोलिसांकडे मदतीसाठी धावलेल्या आजीला साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश भालेराव यांनी मदत करतानाच, २२ हजारांची मदत उभी करून २४ तासांच्या आत आजींच्या निवाऱ्याची व्यवस्था केली.
१६ मे रोजी लता शिवराजसिंह परदेशी या वृद्ध महिला राहण्यासाठी घर नसल्यामुळे मदतीसाठी संध्याकाळी ४ वाजता साकीनाका पोलीस ठाण्यात पोहचल्या. त्यावेळी कर्तव्यावर असणारे पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांच्याकडे त्यांनी आपली व्यथा मांडत निवाऱ्यासाठी मदत मागितली होती.
परदेशी या साकीनाका परिसरातील मोहिली व्हिलेज येथील एका हॉस्पिटलमध्ये गेल्या वीस वर्षापासून साफसफाईचे काम करत. कामानंतर त्या हॉस्पिटलमध्येच राहत असत. मात्र काही दिवसांपूर्वी हे हॉस्पिटलचे बांधकाम अनधिकृत असल्यामूळे पाडण्यात आले होते. ज्यामुळे त्यांची नोकरी तर गेलीच होती सोबतच त्यांचा निवाराही गेला होता. काही वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे आणि एकूलत्या एक मुलाचे निधन झाल्यामुळे त्या एकट्याच असल्याने अखेर आता रहायचे कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला होता.
पोटापाण्याचा आणि निवाऱ्याचा प्रश्न समोर उभा ठाकल्यामूळे बुधवारी लता आजीनी साकीनाका पोलीस ठाण्यात मदतीसाठी धाव घेतली. यावेळी कर्तव्यावर असणारे पोलीस उपनिरीक्षक निलेश भालेराव यांनी त्यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेवून त्यांना मदतीचे हात पुढे केला. आपले सहकारी आणि मित्रपरिवार यांच्या मदतीने त्यांनी २२ हजारांची रक्कम उभी करून, २४ तासांच्या आत लता आजीच्या निवाऱ्याची व्यवस्था करत त्यांना करत कर्जत येथील वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था केली.
सदैव नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या आणि भरतीनंतर आपले पहिल्याच पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असणाऱ्या पोउनि भालेराव यांच्या कामगिरीबद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून कौतूकांचा वर्षाव होत आहे.
Congratulations Mr Bhalerao!