सावधान पवईकर: पोलीस असल्याची बतावणी करत हिरानंदानीत ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न

पोलीस असल्याची बतावणी

ज्येष्ठ नागरिकांना घाबरवून, भोळेपणाचा फायदा घेवून फसवण्याचे, लुटण्याचे प्रकार मुंबईत सर्रास घडू लागले आहेत. ८ मार्च रोजी पवईतील हिरानंदानी भागात सुद्धा एका ज्येष्ठ जोडप्याला ४ लोकांनी मिळून पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली. मात्र, ज्येष्ठ नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्यांचा हा इरादा पूर्ण होऊ शकला नाही.

ज्येष्ठ नागरिक, भोळे सहज विश्वास ठेवतील अशा नागरिकांना टार्गेट करत त्यांना ‘पुढे खून झाला आहे किंवा कोणतीतरी घटना घडली आहे, आम्ही पोलीस आहोत’ अशी बतावणी करून फसवणूक करण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. यासाठी एक विशेष टोळीच कार्यरत आहे. मुंबई पोलिसांकडून सर्वांनी सतर्क राहण्याची किंवा पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्यांना बळी न पडण्याची सूचना नेहमीच केली जाते, मात्र तरीही नागरिक याला बळी पडत आहेत. मुंबई, ठाण्याच्या रस्त्यांवर असा एकही दिवस जात नसेल की एखादा नागरिक अशा बतावणीला बळी पडला नसेल.

८ मार्चला सकाळी ११.२५ वाजण्याच्या सुमारास प्रदीप अमरावतकर आणि त्यांच्या पत्नी माधूरी या हिरानंदानी हॉस्पिटल येथून ऑटो रिक्षाने बँकेत जात होते. यावेळी चार जणांच्या गटाने त्यांच्या ऑटो रिक्षाचा मोटारसायकलवरून पाठलाग केला आणि एमटीएनएल बिल्डींग जवळील उतारावरून ते उतरत असतानाच त्यांच्या रिक्षाला थांबविले. “त्यांच्यातील एकाने आपली पोलिस अधिकारी म्हणून ओळख करून दिली आणि तो रिक्षा चालकाशी रिक्षा का थांबवत नाही म्हणून वाद घालू लागला. त्याने आम्हाला सांगितले की, आज सकाळी शर्मा कुटूंबातील एका व्यक्तीबरोबर चेन स्नॅचिंगची घटना घडली आहे आणि म्हणूनच गस्त सुरू आहे,” असे अमरावतकर यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, “त्याने माझ्या पत्नीला सर्व दागिने काढून बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले. मला शंका आल्याने मी त्याला ओळखपत्र दाखवण्याची मागणी केली असता, त्याने मला ओळखपत्राची एक झलक दाखविल्यासारखे केले. मी पुन्हा ओळखपत्र व्यवस्थित दाखवण्यासाठी आग्रह धरला मात्र तो आयकार्ड दाखवण्यास टाळाटाळ करीत होता. मग मी त्याचा बाईक नंबर घेण्याचा प्रयत्न केला, जो अगदी लहान फाँट आकारात होता. माझी हालचाल बघताच त्या चारही जणांनी तिथून पळ काढला.”

सतर्कतेमुळे प्लान फसला

सुदैवाने ज्येष्ठ नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलीस असल्याची बतावणी करत फसवणूक करून दागिने किंवा मौल्यवान वस्तू नेण्यात ते यशस्वी झाले नाहीत.

“या घटनेची पुष्टी करतानाच, आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काढले आहे. घटना घडलेल्या ठिकाणापासून सीसीटीव्ही कॅमेरे हे दूर आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या वर्णनाचे (निळ्या रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती) कोणीच दिसत नाहीये. त्यामुळे ते चौघे नक्की कुठून आले किंवा इतर माहिती मिळवण्यासाठी परिसरातील अजून सीसीटीव्ही फुटेज आणि माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.

“नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणी आपण पोलीस असल्याचे सांगत असल्यास नागरिकांना त्याचे ओळखपत्र पाहण्याचा अधिकार आहे. याबाबत ते मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती देवून मदत मिळवू शकतात, असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!