@अविनाश हजारे | पवईतील गणेशनगर येथील एकमेव रेशनिंग दुकान शिधावाटप प्रशासनाने इतरत्र हलवल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, याविरोधात आता नागरिकांनी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे.
भांडूप शिधावाटप कार्यालय अंतर्गत असलेल्या ३० ई ९५ व ३० ई ९६ ही दुकाने पवईतील गणेशनगर भागात अनेक वर्षांपासून कार्यरत होती. टाळेबंदीच्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या नागरिकांना या दुकानांमधून झालेल्या अन्नधान्याच्या पुरावठ्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. कालांतराने यातील ३० ई ९५ हे दुकान ३० ई ९६’मध्ये विलीन करण्यात आले आहे. म्हणजेच दोन्ही दुकानातील ग्राहकांना आता एकाच दुकानावर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी एकाच दुकानावर ग्राहकांचा अतिरिक्त भार निर्माण झाला आहे. त्यातच भर म्हणून कि काय, अलिकडच्या २ महिन्यांपूर्वी ३० ई ९६ हे दुकानही इतरत्र हलवत हनुमान रोड येथील ३० ई १३२ या दुकानाशी जोडले गेले आहे.
“गणेशनगर परिसरापासून हनुमान रोड मोठ्या अंतरावर असून, अन्नधान्य घेण्यासाठी नागरिकांना रिक्षाने मोठा वळसा घालून जावे लागते. त्यातच कोरोनाकाळात आधीच आर्थिक स्थिती बिघडलेल्या अनेक नागरिकांना रेशन आणण्यासाठी रिक्षाचे भाडे म्हणून येऊन- जाऊन ६० ते ७० रुपयांचा भुर्दंड गणेशनगरच्या रहिवाशांना बसत आहे,” असे यावेळी बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.
या विषयाला घेऊन समाजसेवक निलेश साळुंखे यांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यासह मुख्यमंत्री, शिधावाटप नियंत्रक यांना सातत्याने पत्रव्यवहार सुरू केला असून, अद्यापही यासंदर्भात कुठलीच कार्यवाही झाली नसल्याची माहिती साळुंखे यांनी दिली.
नागरिकांना भोगाव्या लागणाऱ्या या गंभीर समस्याविरोधात येथील स्थानिक नागरिकांमध्ये जनसंताप निर्माण झाला असून, नागरिकांनी एकत्र येत सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला रहिवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
No comments yet.