पवईतील एका इव्हेंट कंपनीला २ लाखांचे मोबाइल बिल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्राहक नोंदणीसाठी असलेल्या टॅबमधून जपानी आणि कोरियन भाषेत सुमारे २१ हजार संदेश पाठवण्यात आल्यामुळे हॅकिंगचा संशय व्यक्त होत आहे. कंपनीच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पवईत कार्यालय असणाऱ्या एका इव्हेन्ट कंपनीने आपल्या गिऱ्हाईकांच्या नोंदणीसाठी आणि सोईसाठी एक टॅब ठेवला आहे. डिसेंबर २०१७ पासून कंपनी हा टॅब वापरत असून, त्यासाठी दोन सिमकार्डचा वापर केला जातो. ऑगस्ट महिन्यात कंपनीला सिमकार्ड सेवेच्या वापराचे २ लाख ४५३ रुपयांचे बिल प्राप्त झाले. याबाबत सिमकार्ड पुरवणाऱ्या कंपनीकडे चौकशी केली असता, सदर टॅबवरून कोरियन आणि जपानी भाषेत जवळपास २१ हजार संदेश ८१ आणि ९० या सीरिजला पाठवण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. हे संदेश इव्हेंट कंपनीने पाठवले नसल्यामुळे त्यांनी पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
कंपनीतील कोणीच हे संदेश केले नसून, सदर टॅब हा हॅक झाला असल्याचा संशय तक्रारदार नागेंदर सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात व्यक्त केला आहे.
‘आम्ही माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ४३ आणि ६६ अंतर्गत अनोळखी इसमा विरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. पाठवण्यात आलेले सर्वच संदेश हे “http://sagawa.com” या वेबलिंकवर संपत आहेत. त्यामुळे हा हॅकिंगचा प्रकार असू शकतो, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.