चांदिवली येथील मन्नुभाई चाळीत राहणारी सतरा वर्षीय तरुणी फिझा खान ही जवळच असणाऱ्या रामबाग खदानीत मंगळवारी दुपारी पडल्याचा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला आहे. मुंबई अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) जवानांच्या मदतीने दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरुच आहे.
फिझा ही आपल्या परिवारासोबत चांदिवली येथील मन्नुभाई चाळीत राहते ३ वर्षापूर्वी तिचे लग्न ठरले असून, लवकरच तिचे लग्न होणार होते. मंगळवारी दुपारी १.३० वाजता जेवणानंतर शौचास जावून येते असे सांगून घरातून निघाली होती. बराच वेळ होऊनही मुलगी परतली नाही म्हणून संध्याकाळी तिच्या पालक व भावंडांनी शोध सुरु केला असताना, चाळीपासून काही अंतरावर असणाऱ्या पाण्याने भरलेल्या खदानीच्या जवळ तिची ओढणी आणि चप्पल मिळून आली.
“मुलगी पाण्यात पडली असावी असा संशय व्यक्त करत त्यांनी ५ वाजताच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती दिली, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) जवानांच्या मदतीने शोधकार्य सुरु करण्यात आले. जवळपास ४ तास शोधकार्य करूनही पथकांच्या हाती काहीच लागत नसल्यामुळे आणि अंधारात शोधकार्याला अडथळे येत असल्यामुळे रात्री उशिरा शोधकार्य थांबवण्यात आले.
आज (बुधवारी) सकाळपासूनच शोधकार्य पुन्हा सुरु झाले असून, अग्निशमन दल, एनडीआरएफसह स्थानिक मच्छिमार तरुणीचा शोध घेत होते. मात्र बातमी प्रसिद्ध होईपर्यंत शोधकार्य सुरूच होते.
“खदानीची खोली ही खूप जास्त आहे, त्यामुळे बचावकार्य करणाऱ्या टिमकडे असणारया साहित्याच्या मदतीने शोध घेण्यास वेळ लागत आहे” असे याबाबत सांगताना अग्निशमन दलाचे अधिकारी मिटबावकर यांनी सांगितले.
No comments yet.