पवई येथे दूध खरेदीसाठी निघालेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी मोटारसायकल चोरट्यांनी चोरल्याची घटना सोमवारी घडली. मोटारसायकलवरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अधिकाऱ्याच्या गळ्यातील १.१२ लाख किंमतीची सोनसाखळी खेचून पळ काढला.
पवई येथे राहणारे आणि भारतीय तटरक्षक दलात अधिकारी असलेले बिनू नायर (३९) हे सोमवारी घरातून दूध आणण्यासाठी बाहेर पडले होते. पवई येथील आदि शंकराचार्य मार्गावर ६.३०च्या दरम्यान पायी चालत जात असताना यावेळी एक दुचाकी त्यांच्या जवळ आली आणि मोटारसायकलच्या पाठीमागील सीटवर बसलेल्या अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली.
सोनसाखळी खेचताच मोटारसायकल चालकाने तेथून धूम ठोकली. मी दुचाकीस्वाराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. असे पोलिसांना दिलेल्या जवाबात नायर यांनी म्हटले आहे.
पवई पोलिसांनी दोघा अज्ञातांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास करत आहेत.
No comments yet.