गरोदर मातांना कोरोना झाला तर संपूर्ण कुटुंबावर मानसिक तणाव येत असतो. मात्र, पवईतील तीन मातांनी कोरोना व्हायरसवर मात करत कोरोनामुक्त गुटगुटीत बाळांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही माता घरी परतल्या असून, सामान्य जीवन जगत आहेत.
कोरोना विषाणूंचा कहर सर्वत्र पसरत असताना गरोदर महिलांना सुद्धा त्यांनी आपल्या कवेत घेतले आहे. कोरोना संसर्ग असल्याने आजारावर उपचार करणारे रुग्णालये अशा महिलांना आपल्या रुग्णालयात नाकारत आहेत. मात्र काही खाजगी कोवीड रुग्णालये आणि शासकीय रुग्णालये अशावेळी या महिलांसाठी मोठा आधार ठरत आहेत. मुंबईतील नायर आणि सायन रुग्णालयांमध्ये २०० पेक्षा अधिक मातांची यशस्वी प्रसूती करण्यात आली असून, संक्रमित मातांनी सदृढ आणि निरोगी बालकांना जन्म दिला आहे. डॉक्टरांच्या दक्षतेमुळे त्यांच्या नवजात बाळांना कोरोनाची लागण झालेली नसल्याचे दिसून आले आहे. पवईतील हिरानंदानी रुग्णालयात सुद्धा अशा १४ मातांनी गुटगुटीत बाळांना जन्म दिला आहे.
पवईत कोरोना पॉझिटिव्ह म्हणून सापडलेल्या तीन मातांचा सुद्धा यात समावेश आहे. १५ मे रोजी कोरोना बाधित असल्याचे समोर आल्यानंतर वाडिया रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माता रमाबाई आंबेडकर नगर -२ येथील २९ वर्षीय महिलेने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला आहे. शुक्रवारी २९ मे रोजी त्या कोरोनामुक्त होत घरी परतल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे आणि त्यांच्या बाळाचे परिसरात स्वागत केले.
हे सुद्धा वाचा: कोरोना व्हायरसवर मात करत १८ दिवसांचे बाळ झाले बरे, पवईतील रुग्णालयातून डिस्चार्ज
हिरानंदानी येथील एका इमारतातीत राहणाऱ्या आणि ८ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ३९ वर्षीय महिलेने सुद्धा एका सदृढ बाळाला जन्म दिला आहे. दोघेही सुखरूप आहेत. विशेष म्हणजे या महिलेला घरातच अलगीकरणात ठेवण्यात आले होते. हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टर आणि पालिका वैद्यकीय अधिकारी सतत त्यांच्या संपर्कात होते. तिचाही अहवाल निगेटिव्ह आला असून, कोरोनामुक्त झाली असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
पवईतील आरे कॉलोनी रोडवर राहणारी २३ वर्षीय महिलेला सुद्धा २१ एप्रिल रोजी कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. गरोदरपणातील तपासणीसाठी रुग्णालयात तपासणीसाठी गेले असताना तिला लागण झाल्याचे समोर आले होते. या महिलेने सुद्धा कोरोनामुक्त होत निरोगी बाळाला जन्म दिला असून, परिसरातील लोकांनी परिसरात दिवे लावून सकारात्मक वातावरणात दोघांचे स्वागत केले होते.
मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित मिळत असण्याच्या काळातही पवईकरांनी नेहमीच सर्वांना सकारात्मक मार्ग दाखवलेले आहेत. आणि पवईतील ही सर्व उदाहरणे यातील सकारात्मक बाजू दाखवणारीच आहेत.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.