आज (शुक्रवार, ०२ ऑगस्ट) चांदिवली येथील चांदिवली फार्म रोडवर म्हाडा कॉलोनीजवळ असणाऱ्या एका चाळीतील घराची भिंत कोसळल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली. या घटनेत अजून दोन व्यक्ती जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चंद्रकांत मुन्नाप्पा शेट्टी (४०) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, संदीप कदम (३५) हे जखमी झाले आहेत. अजून एक व्यक्ती या घटनेत जखमी झाला असून, त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे शेवटची माहिती हाती येईपर्यंत त्याच्याबद्दल माहिती मिळू शकली नव्हती.
अजून काही व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत असून, अग्निशमन दल, पालिका अधिकाऱ्यांकडून ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.
“पाठीमागील काही दिवसात पुन्हा जोरदार पाऊस मुंबईत परतला आहे. मुसळधार पावसामुळे भिंत कमकुवत झाल्याने दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळत आहे,” असे याबाबत बोलताना साकीनाका पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी पोहचलेल्या मुंबई अग्निशमन दल आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांच्यावतीने शेवटची बातमी हाती आली तेव्हा मलबा हटवत अजून कोणी या मलब्याखाली दबले आहे का याचा शोध सुरु होता.
सुदैवाने घटनेच्या ठिकाणी असणारी चाळ विकासकाकडून काही दिवसांपूर्वीच रिकामी करण्यात आली असल्याने मोठी दुर्घटना टळली.
“घटना घडली तेव्हा काही व्यक्ती या भागात बसच्या प्रतीक्षेत उभे होते. तर काही प्रवासी चालत प्रवास करत होते. जवळच असणाऱ्या म्हाडा वसाहतीत राहणारे शेट्टी हे सुद्धा येथून जात असताना अचानक भिंत त्यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अजून एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे,” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना काही प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
No comments yet.