‘तंत्रज्ञानामुळे अनेक मानवी हातातील कामे मशिन्सकडे आल्यामुळे तंत्रद्यानाच्या नावाखाली सामान्यांच्या हातातील काम हिसकावले जात आहे, याकडे कोणाचेही लक्ष नाही.” असे मत समाजसेविका मेधा पाटकर यांनी नुकतेच व्यक्त केले. पवई येथील आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये त्या बोलत होत्या. या चर्चासत्रासाठी पाटकर यांच्यासोबत आरटीआय कार्यकर्ते शैलेश गांधी सुद्धा उपस्थित होते.
३ ते ५ जानेवारी दरम्यान पवई येथील आयआयटी मुंबईमध्ये आशियातील सर्वात मोठ्या तांत्रिक फेस्टिव्हल ‘टेकफेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलमध्ये मेधा पाटकर व आरटीआय कार्यकर्ते शैलेश गांधी यांना विशेष चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आपले संपूर्ण आयुष्य सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यात खर्ची करणाऱ्या या दोन अवलियांसोबत विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधला.
जनसामान्यांसोबत काम करताना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढताना आलेले थरारक अनुभव मेधा पाटकर यांनी यावेळी सांगितले. देशातील बिघडलेल्या परिस्थितीची धुरा तरुणांनी हातात घ्यायला हवी. माध्यमात संवेदनशील लिखाण करणारे तरुण कमी झाले आहेत. जनसामान्याचा आवाज बनून त्यांना तरुणांनी शब्दांची साथ द्यायला हवी.’ असेही पाटकर यावेळी म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या “तरुणांनी स्वतः प्रकल्पग्रस्त ठिकाणांवर आणि जनसामान्याच्या वस्तीत जाऊन काहीकाळ वास्तव्य करायला हवे. तिथे आर्थिक विषमता, जातीभेद दिसणार नाही. प्रायव्हसीचे फॅडही दिसणार नाही. अशा ठिकाणी जावून तरुणांनी या लोकांच्या संघर्षाला आवाज बनायला हवे.”
शैलेश गांधी यावेळी आपले विचार नवीन पिढीसमोर ठामपणे मांडताना म्हणाले, “माझ्या भारताला महान बनवण्यासाठी मी जबाबदार आहे असे प्रत्येक तरुणाने मनाशी ठरवत भविष्यातील उत्तम भारताच्या जडणघडणीसाठी तरुणांनी तयार व्हायला हवे.”
No comments yet.