साकिनाका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील खाटपे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश सूर्यवंशी आणि पोलिस शिपाई योगेश पोंडे सह एकूण आठ जणांना मुंबई पोलिसांच्या एमआयडीसी गुन्हे शाखेने एका मॉडेलवर बलात्कार आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मात्र ह्या प्रकरणात स्थानिकांचे वेगळेच मत आहे. हे सर्व कट-कारस्थान आहे, कोणीतरी त्यांना ह्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. म्हणूनच त्यांच्या समर्थनात ते कार्यरत असलेल्या संघर्षनगर भागातील स्थानिकांनी मूक मोर्चा, सह्यांची मोहीम राबवून आपला पाठींबा दर्शवला.
ह्या प्रसंगी बोलताना स्थानिक नागरिकानी आवर्तन पवईला सांगितले कि, “सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील खाटपे, साकिनाका पोलिस स्टेशनला हजर होताच, कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेल्या संघर्षनगर बीट चौकीचे प्रमुख म्हणून त्यांना नियुक्त केले गेले होते. बोरीवली राष्ट्रीय उद्यान परिसरातील अनेक कुठूंबांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत ह्या भागात पुनर्वसन झाले आहे. जवळ जवळ ३४ हेक्टर परिसरात पसरलेल्या ह्या भागात नशाखोरी, जुगार, मारामारी, लुटमार, छेडखानी अश्या एक न अनेक गुन्ह्यांनी पाय पसरले होते. खाटपेंनी येताच अश्या गुन्ह्यांना बळ देणाऱ्या सगळ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित केली होती. त्यांच्या बेधडक कारवाईमुळे स्थानिक त्यांना ‘सिंघमच्या’ नावाने ओळखू लागले होते.”
खाटपेंच्या कामाच्या पद्धतीमुळे जनता जेवढी खुश होती, तेवढेच काही लोक नाराज हि होते. त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या जात होत्या, परंतू त्यांची कारवाई चालूच होती. त्यामुळे अश्या लोकांनीच कट रचून त्यांना फसवले असणार असे स्थानिकांचे मत आहे. साकिनाका पोलिस स्टेशनमध्ये हे पहिल्यांदा घडतेय असे नाही, आधी सुद्धा बऱ्याच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याना खोट्या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे. अधिकारी साम-दामाने नाही मानला की त्याला फसवायचे असा इथला इतिहास आहे. असे सुद्धा काही स्थानिकांनी ‘आवर्तन पवईला’ सांगितले.
स्थानिक नागरिक गडीकरांचे म्हणणे आहे कि “राजकीय किंवा इतर हस्तक्षेप करून खाटपेंचे नाव खराब करण्याचे काम केले जात आहे, तेव्हा ह्या प्रकरणात स्वतः पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून निष्पक्षित चौकशीचे आदेश द्यावेत, अशी आमची जनतेची मागणी आहे. मूक मोर्चा काढून आणि सह्यांची मोहीम राबवून आम्ही त्यांच्या सोबत आहोत हेच आम्हाला न्याय व्यवस्थेला दाखवायचे आहे.”
स्थानिक महिला सुद्धा समर्थानात पाठी नव्हत्या “चौकी भर चौकात आणि बाजारात असून लोकांची सतत वर्दळ चालू असते. सात तास डांबून ठेवून दोन-दोन वेळा बलात्कार करणे शक्यच नहिये. आमचा पोलीस खात्यावर विश्वास आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत.” असे स्थानिक महिलांचे म्हणणे आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईत राहणारी व मॉडेल असल्याचा दावा करणाऱ्या एका तरुणीने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना एसएमएस करून तिच्यावर अत्याचार झाला असून तिला मदतीची गरज असल्याचे सांगितले होते. दुसऱ्या दिवशी पोलीस आयुक्त राकेश मारिया आणि सहआयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन तीने झाल्या प्रकाराबाबत माहिती दिली होती. त्या नुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खाटपे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश सूर्यवंशी, शिपाई योगेश पोंडे आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी हॉटेल हॉलीडे इनबाहेरून तिला आणि तिच्या मित्राला जबरदस्तीने ताब्यात घेतले. पोलीस चौकीत आणून तिच्यावर वेश्या असल्याचा आणि तिचा मित्र दलाल असल्याचा आरोप केला. या प्रकरणातून सुटका करण्यासाठी तिच्या जवळील सुमारे पाच लाखांचे दागिने, घड्याळ आणि अन्य मौल्यवान वस्तू हिसकावल्या. मित्राकडून ४ लाख ३५ हजार रुपयांची खंडणी उकळली. मित्र व अन्य आरोपी बाहेर असताना खाटपे याने चौकीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि शेवटी स्थानिक कायद्यानुसार बाराशे रुपयांचा दंड आकारून त्याची सुटका केली अशी माहिती तिने दिली.
मारिया यांनी त्वरित या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या एमआयडीसी युनिटला दिले. त्यानुसार एमआयडीसी गुन्हे शाखेने तत्काळ हालचाल करीत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील खाटपे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश सूर्यवंशी आणि पोलिस शिपाई योगेश पोंडे सह एकूण आठ जणांना अटक केली ज्यात एका महिलेचा हि समावेश आहे. अटकेनंतर गुन्हे शाखेने नोंदवलेल्या जबाबात आरोपी पोलिसांनी अपहरण, जबरी चोरी व खंडणीचा गुन्हा कबूल केला. मात्र बलात्काराचा गुन्हा नाकबूल केला आहे.
तक्रारदार तरुणी सेक्स रॅकेटचा भाग आहे. ती एका एस्कॉर्ट एजन्सीसाठी काम करते. तिला रंगेहाथ पकडण्यासाठी आम्ही सापळा रचला होता. एक तोतया ग्राहक हॉटेलच्या खोलीत बसवला होता. तरुणी तेथे आली, मात्र कागदपत्र, ओळखपत्र नसल्याने तिला हॉटेल कर्मचाऱ्यांनी खोलीत सोडले नाही. आमचा सापळा फसला, मात्र ती बाहेर पडताच तिला आम्ही चोकाशीसाठी ताब्यात घेतले. असा दावा आरोपी पोलिसांनी केला आहे.
याबाबत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेलाही इच्छा असते. तिच्या इच्छेविरोधात किंवा सहमतीविरोधात जबरदस्ती केल्यास तो बलात्काराचा गुन्हा ठरतो. पत्नीलाही पतीविरोधात अशी तक्रार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तक्रारदार तरुणीचा पेशा काय, यापेक्षा तिच्यावर घडलेला गुन्हा आणि त्याचा तपास महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे बोलताना म्हणाले कि आरोपींची वैद्यकीय चाचणी झाली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी, त्यांनी या कारवाईबाबत पोलीस ठाण्यात केलेल्या डायरीची नोंदीची चाचपणीही करण्यात येणार आहे. आरोपी पोलिसांनी रचलेल्या सापळ्याबाबत गुन्हे शाखेचे अधिकारी चौकशी करतील.
No comments yet.