रमाबाई आंबेडकरनगर येथील चंद्रमणी बुद्ध विहाराच्या समोरील पिंपळाच्या झाडाचे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारिप बहुजन महासंघ व धम्मदीप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशन तर्फे हे झाड धनदांडगे आणि चिरीमिरीच्या लोभापायी काही समाजकंठ्कांनी तोडल्याचा आरोप केला जात असतानाच या बुद्द विहाराची व्यवस्था पाहणाऱ्या बौद्ध विकास मंडळाच्या वतीने आम्ही समाजासाठी येथे एक छत उभे करत असून त्यासाठी अडसर करणाऱ्या फांद्या आम्ही पालिका अनुमतीने कापल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकरणामुळे समाजातच वाद निर्माण झाला आहे या वादाचा फायदा घेऊन दोन मांजरांच्या भांडणात माकड लोण्याचा गोळा खावून जावू नये म्हणजे झाले असे काही जाणकारांचे म्हणणे आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या आठवड्यात आयआयटी येथील रमाबाई आंबेडकरनगर परिसरात असणाऱ्या चंद्रमणी बुद्ध विहाराच्या समोरील पिंपळाच्या झाडाच्या फांद्या पालिका आणि बुद्ध विहाराचे कामकाज पाहणारे बौद्ध विकास मंडळ यांनी छाटल्या. ही माहिती आसपास पसरताच भारिप बहुजन महासंघ व धम्मदीप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी या भागात जाऊन पाहणी करून हे कार्य समाजात तेढ निर्माण करण्याचे आणि धनदांडग्याना प्रोत्साहन देणारे असून पहिल्यापासून विरोध असताना सध्याच्या कामकाज पाहणाऱ्या मंडळाने याची परवानगी कशी दिली? असा प्रश्न उपस्थित करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
याबाबत बोलताना बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष भाऊ पंडागळे यांनी आवर्तन पवईला सांगितले, “आम्ही स्थानिक आमदार किरीट सोमय्या यांच्या निधीतून ८ लाख रुपये मंजूर करून घेतलेत. ज्याच्यातून आम्ही बौद्ध विहार समोरील भागात लोकांना बसण्यासाठी छत उभे करत आहोत, तसेच लादिकरणाचे कामही केले जाणार आहे. ही सगळी कामे आम्ही समाज हितार्थ करत आहोत, आमचा कोणताही स्वार्थ त्यात नाही. आमच्यावर विनाकारण आणि समाजहिताचे काम रोखण्यासाठी हे सगळे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत.
“मी स्वतः बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. यापूर्वीही हे झाड कापण्याचे प्रयत्न केले गेले होते, परंतु आमचा विरोध असल्याने ते शक्य होऊ शकले नव्हते. समाजातील लोकांचाही यास विरोध होता, मग यांनी हे झाड छाटण्यास अनुमती मिळवून छाटलेच कसे? विना स्वार्थ हे शक्य आहे का?” बौध्द विकास मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल बिरारे यासंदर्भात बोलताना म्हणाले.
समाज हितार्थ काम करताना समाजाचे मत जाणून घेणेही जरुरी आहे. आज फांद्या तोडल्या उद्या झाड तोडलं आणि परवा आणखी काही आणि परत म्हणाल आम्ही समाज हितार्थ केले आहे. संपूर्ण समाजाचा याला विरोध होता म्हणून सगळ्यांशी लपवून गुपचूप हे काम केले गेले आहे. या कृत्यामुळे संपूर्ण समाज दुखावला गेला आहे आणि वृक्षतोड माफियांवर कठोर कारवाई करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे, असे धम्मदीप सोशल अँण्ड कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष विरेंद्र धिवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
परंतु समाजातील अनुभवी आणि जेष्ठ लोकांचे मत जरा वेगळेच आहे ‘हा सगळा राजकीय खेळ चालू असून, समाजातील लोकांचे आपापसातच भांडण चालू आहे. दोन मांजरे लोण्याच्या गोळ्यासाठी लढतात तशी, पण त्या गोष्टीत माकड लोण्याचा गोळा गडप करून टाकतो याचा बहुतेक यांना विसर पडलेला आहे. यांच्या बाबतीत तसे घडू नये म्हणजे झाले.
नैसर्गिक छत तोडून अनैसर्गिक छत बांधणार्या बौध्द विकास मंडाळाचे समाज हीत…..
नैसर्गिक छत तोडून अनैसर्गिक छत बांधणार्या कार्यरत बौध्द विकास मंडळ समाज हितासाठी बोधीवृक्षाचे खोड (मोठ्या फांद्या ) तोडले असे सांगत असतील तर समाजाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता या नात्याने मला आवर्तन पवईच्या माध्यमातून या मंडळाला असे विचारयाचे आहे की, असे कुठले समाजहिताचे कार्य करायचे होते?. जेने करून त्यांनी बोधीवृक्षाचे खोड (मोठ्या फांद्या ) समाजाला विश्वासात न घेता आणि सार्वजनिक बैठका न बोलवता तातडीने तडकाफडकी तोडले. अश्या प्रकरणाला घाई का केली हा एक प्रश्न चिन्ह आहे. याचे उत्तर उपरोक्त मंडळाने सार्वजनिक बैठक घेवून खुलासा करावा. बोधीवृक्षाचे खोड (मोठ्या फांद्या ) तोडायला जेवढी घाई करण्यात आली तेवढीच घाई बैठक घेण्यासाठी का केली जात नाही?
बौध्द विकास मंडळाचा आज पर्यंतच्या इतिहासात बुध्द विहार बांधण्याचे काम असो किंवा नुतणीकरणाचे काम असो त्या सर्वे विषय सार्वजनिक बैठक आणि लोकशाही मार्गाने झाल्या परंतु या कार्यरत मंडळीने हा पायंडा न पाळता हुकुमशाही पध्दतीने समाज हीताच्या कामासाठी की अन्य कुणाच्या कामासाठी केले आहे . हा एक समाजामध्ये प्रश्न चिन्ह आहे ? तरि माझी आपल्या आवर्तन पवईच्या माध्यमातून या कार्यरत मंडळाला विनंती आहे की, त्यांनी सार्वजनिक बैठक बोलवावी जेणेकरून समाजामधील या विषयावर असणारी अस्वस्थता संपुष्टात येईल.
विरेंद्र धिवार
धम्मदीप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिशन
अध्यक्ष