अनोळखी चोराने उंदराप्रमाणे भुयारी मार्ग खोदून, मध्यरात्री ज्वेलरी शॉपमध्ये घुसून, दुकानातील १.७ लाखाची चांदिचे दागिने लुटून घेवून गेल्याची अनोखी घटना साकिनाका पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. दुकानाच्या जवळून जाणाऱ्या ड्रेनेज लाईन सोयीचा आधार घेत, चोरट्याने भुयारीमार्ग बनवून दुकानात प्रवेश करत ही चोरी केली आहे. याबाबत साकिनाका पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे.
साकिनाका येथील आर. एन. ज्वेलर्स यांनी रविवारी संध्याकाळी शिल्लक मालाचा तपशील घेऊन आपले दुकान बंद केले. सोमवारी सकाळी पुन्हा जेव्हा त्यांनी दुकान उघडले, तेव्हा पाहतात तर काय दुकानात ठेवलेले चांदिचे दागिने चोरीला गेलेले होते, असे दुकान मालकाने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले आहे.
याबाबत बोलताना साकिनाका पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही तपास सुरु केला आहे. दुकानाच्या जवळून सांडपाणी वाहून नेणारी ड्रेनेज लाईन जाते. ती वापरात नसल्याने चोरट्याने याचा फायदा घेत तिथून भुयारी मार्ग बनवून दुकानात प्रवेश केला व चोरी करून त्याच मार्गाने तो निघून सुद्धा गेला.”
याबाबत साकिनाका पोलिसांनी चोरीची तक्रार नोंद करत चोरट्याचा तपास सुरु केला आहे.
No comments yet.