कथा ♥ ‘प्रीत’ ♥ भाग २
काल तिने आग्रह केला, ऑफिसमधून सोबत निघू. मी नाही म्हणालो पण नाईलाज झाला होता. मी तिच्यासोबत चालू लागलो. रेल्वेस्थानक येईपर्यंत चालणं अपरिहार्य होतं. चालतांना एकमेकांना होणारा स्पर्श आणि त्यातून उठणारे रोमांच, डोळ्यांमधील लपलेले भाव, ओठातलं हास्य, सगळं काही मनात कारंजे उभे करीत होतं. ती १० मिनिटे कशी गेली समजलच नाही. माझं स्थानक आलं होत तिचं घर तिथून ५ मिनिटावर होतं. मी निघतो म्हटलो, पण तिने नाहीचा इशारा केला. थांबा, बोलायचंय एवढंच ती म्हणाली. माझं लक्ष मनगटावरील घड्याळाकडे गेले. घरी कोणीतरी वाट पाहतंय याची जाणीव आणि तिने मागितलेला वेळ यामध्ये मी अडकलो होतो. जर पांडुरंगाने याक्षणी काय हवं विचारलं असत तर मी वेळेचा कंट्रोल माझा हाती मागितला असता. बदलला असता तिचा भूतकाळ आणि बहुदा माझा वर्तमान. ते नसत जमलं तर गोठवली असती सध्याची ही वेळ.
मी तिचा भूतकाळ जाणून घ्यायला उत्सुक आहे याची बहुतेक तिच्या मनाला चाहूल लागली होती.
त्याचे नाव राहूल ! तीने त्याच्याविषयी सांगायला सुरवात केली.
त्यावेळी मी कुर्ल्याला आणि तो चुनाभट्टीला रहायचा. आम्ही एकाच शाळेत शिकायचो आणि एकाच वर्गात सुद्धा. आजही आठवतोय मला तो तसाच वेंधळा. कधीच शर्ट-इन नसल्याने नेहमीच मास्तरांनी वर्गात उभा केलेला. तरीही आभ्यासात मात्र हुशार; नंबरात येणारा. तो तसाच होता की तसा वागत होता हे मला कधीच कळाले नाही.
आम्ही रोज चालत जायचो शाळेत, भेटायचो रोज. नेहमी माझी मस्करी करायचा. वेणी ओढायचा, मोटी म्हणून चिडवायचा, वाकुल्या दाखवायचा. एकदम जवळचा मित्र होता तो. एकदा माझा अभ्यास झाला नव्हता. घरातून शाळेसाठी निघाले खरे, पण आज शाळेत जायला नको ठरवून अर्ध्या रस्त्यातून मी दुसरीकडे जायला निघाले. वाटेत तो भेटला, त्याने विचारलं काय झालं? म्हटलं भीती वाटते रे! अभ्यास नाही झाला माझा! तर म्हणाला चल घाबरू नको, करू काहीतरी! वर्गात गुरुजींना त्याची वही दाखवली. गुरुजींची शाबासकी माझा पाठीवर आणि बोटांचे व्रण याचा गालावर. कदाचीत तेव्हाच मी त्याच्या प्रेमात पडली.
उन्हाळ्याची सुट्टी नको वाटायची. शाळा बंद. आम्ही गावी जायचो मग दोन दोन महिने एकमेकांपासून दूर रहाणे त्रासदायक वाटायचे. आई बाबांचा खुपदा मारही खाल्ला मला नाही यायचं गावी म्हणून. नव्हतं समजावता येत त्याना. त्याला नुसतं पाहिलं तरीही मन प्रसन्न व्हायचं. माझं संपूर्ण आयुष्य त्याच्याभोवती येऊन थांबलं होत. मैत्री कि प्रेम? माझ मलाच कळतं नव्हतं. एकमात्र नक्की मला तो सदैव हवा होता सोबत, तेव्हाही आणि आजही. ती त्याच्या बाबत भरभरून बोलत होती.
दिवस भुरकन उडून जात होते. आमचे बारावी पर्यंतच शिक्षण त्याच शाळेत झाल्याने एकमेकांमध्ये गुंतत जाऊन मैत्री कधी प्रेमात बदलली कळलंच नाही. दोघेही एकमेकांचे झालो होतो. प्रेमाच्या शपथा, आणाभाका, मुव्हीज, क्लास बंक, हातात हात घालून फिरणं, तासन तास गप्पा मारत बसने सर्व सर्व काही करून झाले होते. एवढेच नव्हे तर मुलांची नावही ठरवून ठेवली होती. मुलगी झाली तर आर्या आणि मुलगा झाला तर नील. कधी वाटलंच नव्हते वेगळे होऊ. स्वप्न स्वप्न दिवस आणि रात्री सरकत गेल्या. आम्ही आमचं एक जग विणत होतो सुरवंटासारखं. तेव्हा माहित नव्हतं कधीतरी कोणालातरी पंख येतील आणि फुलपाखरू बनून उडून जाईल. मग उरेल तो कोष आम्ही विणलेला, कोण्या एकासाठी बनून नविसरता येणारा भूतकाळ.
फुलपाखरांची स्वप्न दाखवली तू,
सुरवंट बनून तो एक जीव फसला.
रेशीम स्वतः भोवती गुंडाळणारा,
आज स्वतःच जगच हरवून बसला. – स्वतेज
बारावीनंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंट करायचं ठरवलं. तो पुण्याला शिफ्ट होणार होता. मी कसं सहन करायचे हे, गेली ७ वर्ष एकत्र होतो आम्ही. मी सांगितलं नाही जायचं तू. तेव्हा म्हणाला आपल्या भविष्यकाळासाठी आवश्यक आहे. नाईलाज झाला होता. दोन दिवस आणि रात्री माझ्या उशांचे ओले झालेले कव्हर पाहून घरचे ओरडले होते. काय हा वेडेपणा, मित्रासाठी कोणी रडत का एवढं?
कळतं नव्हतं काय करावं. त्याला थांबवता येत नव्हतं आणि मला त्याचा सोबत जाताही येत नव्हतं. ठरलं, बाबांच्या औषधाच्या गोळ्या खाल्ल्या आणि मग सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. जे काही करतेय ते बरोबर की चूक काही कळत नव्हतं, फक्त एकच माहित होत त्याचा सोबत रहायचंय. खूप समजावलं सगळ्यांनी पण सगळं व्यर्थ. शेवटी आईनेच त्याचा घरी नेऊन सोडलं.
पुण्यात दोन दिवस सोबत घालवले आणि मग माघारी फिरले. मन मात्र कुठे भरतय. परिस्थितीमुळे मी नोकरी करीत होती आणि तो शिकत होता. दर रविवारी मी पुण्याला जायची त्याला भेटायला. आम्ही खूप मजा करायचो सकाळपासून संध्याकाळ पर्यंत. निघताना मात्र पाय जड व्हायचे. रविवार येईपर्यंत रोज दिवस बोटावर मोजायचो. आमचं प्रेमाच नात दिवसेंदिवस घट्ट बनत होत. माझ्यासाठी सगळे संपले होते, राहुल आणि मी हेच माझे जग होते.
३ वर्ष निघून गेली आणि तो परत आला. आभाळ जणू ठेंगण झालं होते मला. एव्हाना आमच्या घरच्यांना आमच्या प्रेमाची कल्पना आली होती. मुंबईत लगेच त्याला नोकरीही मिळाली. स्वप्नानी पुन्हा भरारी घेतली. असं करायचं, तस करायचं. तो नोकरीत रुळू लागला आणि सोबतच अजूनही कुठेतरी. माझ्या जगात काहीच बदलल नव्हतं, त्याचं जग मात्र हळूहळू बदलू लागल होत. तो तिच्यात गुंतला होता.
आमच्या भेटी आणि बोलणं संपलं नव्हतं, पण मला बदल जाणवत होता. ती ओढ, ती जवळीक कुठेतरी हरवत होती. मला काय चाललय काहीच कळत नव्हतं. एक दिवस भेटून त्याने मनातील बोलून दाखवलं. त्याला आम्ही दोघीही हवे होतो. मला काहीच कळत नव्हते, त्याने पर्याय दिला आणि मी तो घेतला. तिला मात्र हे मान्य होणार नव्हतं. तिने पर्याय दिला ती किंवा मी. त्याने तिच्यासोबत जायचं ठरवलं. माझ्यासमोर निल, आर्या, घर, सगळी स्वप्ने गरगर फिरत होती.
टोकाच्या निर्णयावर जाता येत नव्हतं. रडून तो परत येणारा नव्हता. ती हे सगळं बोलत होती शून्यात पाहून. तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि वेदना मला जाणवत होत्या. प्रेम माणसाला इतकं हतबल आणि दुर्बल करते हे मी प्रथम पाहत होतो.
बराच वेळ झाला होता. मलाही निघायचं होत, कोंणीतरी घरी वाट पाहत होत. पण ती जे काही सांगून गेली ते भयावह होत. माझ्या विचारा पलीकडचे होत सर्व. प्रेमाचे अनेक रंग मी पहिले होते. हा मात्र मला विचारमग्न करून गेला.
क्रमशः
या कहाणीतील पात्र आणि घटना काल्पनिक आहेत, त्याचा कुठल्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी कसलाही संबंध नाही. आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
______________________________________________________________
लेखक अमित मरगजे हे “स्वतेज” या टोपण नावाने लिखाण करतात. ते एक्सपोर्ट कंपनीत उच्च पदावर काम करत असून, कामानिमित्त विविध ठिकाणी प्रवास करताना त्यांना लिखाण करणे आवडते. आजपर्यंत त्यांनी स्वतेज या नावाने अनेक चारोळ्या, लघुकथा, लेखमालांचे लिखाण केले आहे. लेखकाला आपण [email protected] वर संपर्क साधू शकता.
No comments yet.