नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आयआयटी, चैतन्यनगर येथे पाच तरुणांवर प्राणघातक हल्ला करून व चोरी करून पसार झालेल्या टोळीच्या एका म्होरक्यासह अजून एकाला पवई पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्यांच्या इतर दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
१ जानेवारीला आयआयटी येथे वेगवेगळ्या तीन ठिकाणी संगनमत करून एका टोळक्याने धारदार शस्त्राने पाच तरुणांवर प्राणघातक हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केले होते. प्रदिप भदरगे (२८), विकास धिवार (३१), नितीन गच्छे (२६), आकाश ओव्हाळ (२०), अक्षय सोनावणे (२४) असे यात जखमी झालेल्या तरूणांची नावे आहेत.
याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश ओव्हाळ हा आपल्या मोटार सायकल क्रमांक एम. एच. ०३ ए. एस. ९६१८ वरून चैतन्यनगर येथून रात्री १२.१५ वाजता जात असताना, त्याला अडवून त्याच्या खिशात असणारा मोबाईल फोन काढून घेवून, जुन्या भांडणाचा राग मनात असणाऱ्या अमित पांडे याने आकाश व त्याचा चुलत भावास लाकडी बांबूने मारहाण केली. अच्चू हवाले व बाबू हवाले याने हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर अजून एक पाहिजे आरोपी काली उर्फ पाल याने प्रदिप, विकास आणि नितीन यांच्यावर धारदार शस्त्राने आपखुशीने हल्ला करत गंभीर जखमी केले.
“गुन्हेगार हे जखमींना आधीपासूनच ओळखतात, त्यांच्यात पूर्वीपासून वाद होता. ३१ तारखेच्या रात्री त्यांचा एकमेकांशी सामना झाला आणि जुन्या रागाच्या भरात हा गुन्हा घडला आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
विकास धिवारचे भाऊ विरेंद्र यांनी मात्र पोलिसांचा हा दावा खोटा ठरवत सांगितले, “गुन्हेगारांशी माझ्या भावाची कसलीही ओळख नाही. उलट सर्व जखमी सुद्धा एकमेकांना विशेष ओळखत नाहीत, पोलीस निराधार आरोप करत आहेत.”
पवई पोलिसांनी भादवि कलम ३९२, ३२६, ३४१, ३२४, ३२३, ५०४. ३४ नुसार गुन्हा नोंद करत अमित पांडे व बाबू हवाले याला अटक केली असून, त्यांचे इतर दोन साथीदार अच्चू हवाले आणि काली उर्फ पाल याचा शोध घेत आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.