आजच्या जमान्यातही समाजात प्रामाणिकपणा, माणुसकी टिकून आहे याची प्रचिती देणारे उदाहरण पवईतील तरुणांच्या कृत्यातून समोर आले आहे. पैशांनी भरलेले पाकीट रस्त्यावर मिळाल्यानंतर पवईकर तरुणांनी प्रामाणिकपणा दाखवत त्या पाकिटाच्या मूळ मालकाचा शोध घेऊन, त्यास पाकीट परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. माता रमाबाईनगर येथील नवदुर्ग मित्र मंडळाचे गणेश सातवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे कार्य केले आहे.
सातवे आणि त्यांचे मित्र संध्याकाळी परिसरात असणाऱ्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी जात असताना एक पैशांचे पाकीट त्यांना रस्त्यावर पडलेले आढळून आले. उचलून पाहिले असता त्यात जवळपास १९ हजार रुपये आणि काही कागदपत्रे होती.
मिळालेल्या पैशांचा मोह न ठेवता तरुणांनी पाकिटात कोणाचा पत्ता सापडतो का याचा तपास केला, परंतु त्यात कोणताच पत्ता आढळून आला नाही. पत्ता तपासण्या दरम्यान मात्र जयंतीसाठी टी-शर्ट बनवायला दिल्याची एक पावती त्यांना सापडली. त्याच्यावर दिलेल्या फोन नंबरच्या आधारे टी-शर्ट बनवणाऱ्या व्यक्तीकडे फोन करून, पावती क्रमांकच्या आधारावर चौरे या व्यक्तीने टी-शर्ट बनवायला दिल्याचे समजले.
“टी-शर्ट बनवणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या फोन नंबरवर आम्ही फोन करून काही हरवले आहे का? याची माहिती समोरच्या व्यक्तीला विचारली असता, त्याने ‘हो माझे पैशाचे पाकीट हरवले आहे’ अशी माहिती दिली. त्याने सांगितलेले नाव आणि टी-शर्ट बनवायला दिलेल्या ठिकाणचे नाव जुळल्याने आम्ही त्यास पाकीट सापडले आहे! तू कुठे आहेस? आम्ही येऊन देतो! असे सांगून तो राहत असलेल्या जयभीमनगरमध्ये जाऊन त्यास आम्ही ते पाकीट सुपूर्द केले” असे आवर्तन पवईशी बोलताना गणेश सातवे यांनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.