इंदिरानगरच्या सार्वजनिक शौचालयाच्या छताला बनविला आपला अड्डा
चरस, गांजा, दारू यांची नशा करून नशेखोरांनी आयआयटी भागात हैदोस घालण्याचे प्रकार वाढलेले आहेत. इंदिरानगर येथील शौचालयावर तर चक्क काही नशेखोरांनी आपला अड्डा बनवला आहे. या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी सह्यांची मोहीम राबवून युथ पॉवर संघटनेतर्फे पवई पोलिसांना लेखी पत्राद्वारे तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे.
तुंगा येथील लहान मुलीवर नशेखोरांनी केलेला अत्याचाराच्या पवईकरांच्या जखमा अजून ओल्या असतानाच, पार्कसाईट परिसरात नशेखोराने २ वर्षाच्या लहान मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे पवईकरांमध्ये भीतीचे वातावरण असून, लहान मुलांना घराबाहेर खेळायला पाठवायला सुद्धा लोक घाबरत आहेत. त्यातच भर म्हणून अनेक भागात अशा नशेखोरांनी धुडगूस घातला आहे. आयआयटी इंदिरानगर येथील बॉम्बे पब्लिक स्कूलच्या पाठीमागे असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाच्या छतावर तर गेल्या काही महिन्यांपासून चरसी, गर्दुले, नशेखोर यांनी चक्क आपला अड्डा बनवला आहे.
“शौचालयाच्या छतावर अंधार होताच या नशेखोरांची मैफल जमते. नशा करण्यासोबतच हे नशेखोर विजेचे दिवे फोडणे, महिलांना दगड मारणे, अर्वाच्य भाषेत बोलणे असे प्रकार करतात. यामुळे तरुण मुलींनी संध्याकाळी शौचालयाला जाणे टाळले आहे,” असे आवर्तन पवईशी बोलताना येथील महिलांनी सांगितले.
आयआयटी परिसरातील अनेक भागात नशेखोर नशा करताना आढळून येतात, मात्र यांच्यावर पोलिसांकडून कारवाई का केली जात नाही? असा संतप्त सवाल यावेळी बोलताना काही महिलांनी उपस्थित केला.
“इंदिरानगरमधील शौचालयाच्या छतावर तरुण नशा करत असून, महिलांच्या छेडछाडीचे व येथील विजेच्या दिव्यांचे नुकसानीचे प्रकार घडत असल्याची तक्रार येथील स्थानिक महिलांनी केली होती. ज्यासंदर्भात स्थानिकांच्या सह्यांचे एक पत्र युथ पॉवर संघटनेतर्फे पोलिसांना देत त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे”, असे आवर्तन पवईशी बोलताना संघटनेचे मुंबई अध्यक्ष विरेंद्र धिवार यांनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.