@अविनाश हजारे
गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असलेला व केव्हाही कोसळेल या अवस्थेत असलेला पवईतील पासपोली कडे जाणाऱ्या रस्त्यावरील लोखंडी बीम रॉड अखेर पडला असून, त्यात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही मात्र या प्रकाराने प्रशासन लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती उदासीन आहे हे या निमित्ताने पहायला मिळत आहे.
एस विभाग अंतर्गत येत असलेल्या पवई येथील एल अँड टी वरून पासपोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वरच्या बाजूला ब्रिटिशकालीन जलवाहिनी असल्याने तो रस्ता अरुंद असून मोठया उंचीच्या गाड्या येथून जाऊ नये यासाठी हा लोखंडी बीम रॉड लावण्यात आला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हा बीम रॉड केव्हाही कोसळेल या अवस्थेत होता. येथील स्थानिक असलेला पवन पाल नामक या जागृत तरुणाने पालिकेला या प्रकाराची माहिती दिली होती व ती दुरुस्त करण्याची मागणीही केली होती परंतु, पालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने सदरची घटना घडली आहे. याला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात असून, लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन किती गंभीर आहे याची प्रचिती यानिमित्ताने येत आहे.
“मी याची माहिती आधीच पालिका प्रशासनाला दिली होती, हे केव्हाही कोसळू शकते याची कल्पनाही दिली होती मात्र , याकडे दुर्लक्षित केले गेले. या घटनेत कुणाच्या जीविताची हानी झाली असती तर, त्याला जबाबदार कोण असते? असा सवाल पवन पाल यांनी यावेळी बोलताना केला.
No comments yet.