बुधवारी दुपारी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर मिलिंदनगर सिग्नलजवळ विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स दुकानांमध्ये घेऊन जाणारा एक छोटा टेम्पो उलटल्याची दुर्घटना घडली. याचा फायदा घेत रस्त्यावरून प्रवास करणारे आणि स्थानिक नागरिक यांनी दारूच्या बाटल्या पळवल्या. बाटल्या फुटल्यामुळे रस्त्यावर काचेचा ढीग लागला होता, सोबतच रस्त्यावर ऑइल आणि दारू पसरल्यामुळे बराच काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा मार्केटिंग कंपनीचा एमएच ०४ एफयू ८२१५ टेम्पो विदेशी दारूचे बॉक्स घेऊन जोगेश्वरीच्या दिशेने जेव्हीएलआरवरून चालला होता. मिलिंदनगर सिग्नलजवळ येताच ओव्हरटेक करताना गाडीचा ड्राइवर सुरज सातपुते याचा ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्यावरच पलटी झाला.
अपघातामुळे बॉक्स खाली पडून दारूच्या बाटल्या फुटून संपूर्ण रस्त्यावर दारू वाहत होती. सोबतच गाडीतील ऑइल रस्त्यावर सांडल्याने संपूर्ण रस्ता घसरडा झाला होता. जवळच असणाऱ्या साकीनाका वाहतूक विभागाच्या पोलीस हवालदार अशोक निगडे, पोलीस शिपाई चंद्रकांत राऊत, पोलीस शिपाई रवींद्र विंचू यांच्यासह पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
अग्निशमन दलाने पाणी टाकून रस्ता धुवून काढल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली. मात्र तो पर्यंत अनेक वाटसरूंनी आणि नागरिकांनी दारूच्या बाटल्या पळवल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
‘टेम्पोच्या नुकसानीची किंवा टेम्पोतील सामानाच्या चोरीची तक्रार नोंदवायला कोणीच पोलीस ठाण्यात आले नसल्यामुळे पोलीस ठाण्यात कसलीच तक्रार नोंद करण्यात आलेली नाही’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.