आ यआयटी येथील पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये शुक्रवारी निव फौंडेशन आणि पवई इंग्लिश हायस्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मुंबई विभागाचे गुप्तचर अधिकारी कुलभूषण सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला निव फौंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा कमलप्रित कौर, पवई इंग्लिश हायस्कूल माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शेरली पिल्लाई, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भावना मॅडम, शिक्षक, व्यवस्थापक व मोठ्या प्रमाणावर पालक उपस्थित होते.
शाळा, महाविद्यालयातील तरूण पिढी या अंमली पदार्थाच्या व्यसनाधिन होऊ नये, याकरिता पोलिसांसह, विविध स्वयंसेवी संस्था व शाळांनी विद्यार्थी व तरुणांमध्ये जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे संपूर्ण पिढीचे आयुष्य बरबाद होत आहे. यासाठीच पवई इंग्लिश हायस्कूलमधील मुलांमध्ये याबाबत जागृती निर्माण होऊन वाढत्या नशाखोरीला आळा घालण्यासाठी निव फौंडेशनने शाळेसोबत मिळून जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे अधिकारी कुलभूषण सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नशाखोरीच्या विळख्याबाबत आपले अनुभव सांगितले. केवळ जिज्ञासेपोटी या अंमली पदार्थांची चव चाखणारे आज या गर्तेत आपसुकच सापडले आहेत. असे लोक आपल्यासह आपल्या संपूर्ण परिवाराचे आयुष्य उध्वस्त करतात. यावेळी त्यांनी नशेच्या आहारी गेलेल्या मुलांच्यात दिसणारी लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना याबाबतही विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले, तसेच नशाखोरीसाठीच्या कायद्याचे सुद्धा यावेळी त्यांनी विश्लेषण देत, यातील अपराध्यांना १० ते २० वर्ष शिक्षा आणि पुन्हा पुन्हा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेप होण्याची शक्यता सुद्धा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी होणाऱ्या दुष्परिणामाबाबत पथनाट्य सादर केले, तसेच नशामुक्तीचे संदेश छत्र्यांवर लिहून त्यांचे वाटप विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आले.
“शाळेत सर्व स्तरातून शिकण्यासाठी मुले येत असतात. त्यांच्या आसपास अंमलीपदार्थ सेवनाच्या गोष्टी घडल्यावर किंवा संगतीने सुरुवातीला मज्जा म्हणून त्यांच्याकडून केला गेलेला प्रयोग नंतर जीवावर बेतू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये याच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती व्हावी म्हणून आमच्या शाळेच्यावतीने ‘से नो टू ड्रग्स’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते”, असे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका शेरली पिल्लाई यांनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.