पवई किडनी रॅकेट: सातव्या आरोपीला अटक

kidney racketहिरानंदानी हॉस्पिटलमधून उध्वस्त करण्यात आलेल्या किडनी रॅकेटमध्ये पोलिसांनी युसुफ बिस्मिल्लाह दिवान (४५) नामक सातव्या आरोपीला गुजरातमधील नदियाद येथून सोमवारी अटक केली आहे. दिवान हा ट्रक चालक असून रुग्णाची पत्नी म्हणून दाखवण्यात आलेल्या शोभा ठाकूरला किडनी देण्यास प्रवृत्त करणे आणि यातील मुख्य आरोपीशी ओळख करून देणे असा त्याचावर आरोप आहे. मंगळवारी त्याला कोर्टात हजर केले असता २२ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

शोभा ठाकूरचा पती हा दारुडा असल्यामुळे त्यांना असणाऱ्या ५ मुलांची जबाबदारी तिला स्वतःलाच सांभाळावी लागत होती. घरकाम करून कसेबसे घर चालत असल्याने तिच्यावर असणाऱ्या कर्जाची परतफेड करणे तिला शक्य होत नव्हते. “दिवानने ‘मुंबईमध्ये एका रुग्णाला किडनीची गरज आहे, तू जर किडनी दिलीस तर तुला ३ लाख रुपये मिळतील, ज्यातून तू कर्ज फेडू शकते आणि तुला मुलांचा सांभाळही व्यवस्थित करता येईल,’ असे तिला सांगून किडनी देण्यास तयार केले. त्यानंतर तिला मुंबईला आणून मुख्य आरोपी बैजेन्द्र भिसेन याच्याशी ओळख करून देवून तो परत निघून गेला”, असे आवर्तन पवईशी बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ठाकूर आणि भिसेन यांनी दिलेल्या माहिती आणि पत्याच्या आधारावर पवई पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील नदियाद येथून दिवान याला अटक केली आहे.

या गुन्ह्यातील इतर सहा आरोपी भैजेंद्र भिसेन (मुख्य आरोपी), भरत शर्मा (मुंबई एजेंट),इक़्बाल सिद्दिकी ((मुंबई एजेंट)) व किशन जैस्वाल (रुग्णाचा मुलगा), निलेश कांबळे (हिरानंदानी हॉस्पिटलमधील अवयव प्रत्यारोपण समन्वयक), ख्वाजा पटेल (बनावट कागदपत्र बनवणार) यांना सुद्धा मंगळवारी कोर्टात हजर केले गेले. पोलिसांनी यातील आरोपी हे चुकीची माहिती पुरवत असून यात अजूनही बरेच लोक सहभागी असू शकतात, त्यामुळे यांना पुढील तपासासाठी ताब्यात देण्यात यावे अशी मागणी पोलिसांतर्फे कोर्टात केली होती. त्या आधारावर त्यांना कोर्टाने २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

यावेळी कोर्टाने किडनीदाता शोभा ठाकूरच्या अटकेबाबत विचारणा केली. ज्याबाबत बोलताना सरकारी वकिलांनी ठाकूर आणि जैस्वाल यांना अद्याप डिस्चार्ज दिला गेला नसल्यामुळे अटक केली नसल्याचे सांगितले.

‘पुढील सुनावणीच्या वेळेस तपासी अधिकाऱ्याने सर्व कागदपत्रांसह कोर्टात स्वतः हजर रहावे’ असा आदेश सुद्धा कोर्टाने यावेळी दिला.

सरकारी अधिकाऱ्यांच्या पत्यावर बनवले बनावट पुरावे

रुग्ण ब्रिजकिशोर जैस्वाल आणि त्यांची पत्नी म्हणून दाखवण्यात आलेल्या रेखादेवी (शोभा ठाकूर) यांचे आधारकार्ड, रेशनकार्ड व इतर बनावट कागदपत्रे मलबार हिल येथील सरकारी अधिकाऱ्यांच्या पत्यावर बनवण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात ब्रिजकिशोर हे सुरतचे रहिवासी असून, पत्नी म्हणून दाखवण्यात आलेल्या शोभा ठाकूर या आनंद गुजरात येथील रहिवासी आहेत.

“प्रमुख सुत्रधार भिसेन याने दिलेल्या माहितीच्या आधारे, आम्ही शनिवारी मुंब्रा येथून बनावट कागदपत्रे बनवण्याचे काम करणाऱ्या ख्वाजा पटेल याला अटक केली आहे”, असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

बनावट कागदपत्र बनवणाऱ्या आणि बोगस नोटरी बनवणाऱ्या आरोपींचा शोध

ब्रिजकिशोर जैस्वाल आणि शोभा ठाकूर हे पती-पत्नी आहेत अशी बोगस नोटरी बनवणाऱ्या वकील आणि बनावट कागदपत्र बनवणाऱ्या ख्वाजा पटेल याला सरकार दफ्तरीची कागदपत्रे मिळवून देण्यात कोणी मदत केली आहे? याचा पवई पोलीस तपास करत आहेत.

शोभा ठाकूरची आरोग्य तपासणी

हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेट उध्वस्त करण्यात आले, तेव्हा शोभा ठाकूरची शस्त्रक्रिया चालू होती. त्यामुळे त्यांची किडनी व्यवस्थित आहे का? याची खात्री करून घेण्यासाठी बुधवारी तिच्यावर जेजे रुग्णालयात एमआरआय, सिटी स्कॅन आणि अल्ट्रासोनोग्राफी तपासणी करण्यात आली.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!